उधारीचे पैसे मागितल्याचा राग, डोंबिवलीत हॉटेल चालकावर चाकूने हल्ला
उधारीचे पैसे मागितले म्हणून ग्राहकाने हॉटेल चालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली. याप्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
डोंबिवली / सुनील जाधव : हॉटेलमध्ये बसून उधारीवर चहा नाश्ता करणाऱ्या इसमाकडे उधारीचे पैसे मागणे एका हॉटेल चालकाला चांगलेच महागात पडले आहे. घर रस्त्यात पैसे मागितल्याने संतापलेल्या इसमाने हॉटेल चालकावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले आहे. डोंबिवली गोळवली परिसरात ही घटना घडली. जखमी हॉटेल चालकावर रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी मानपाडा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
डोंबिवली पूर्वेकडील पांडुरंग वाडी परिसरात राजेंद्र प्रसाद यादव यांचे यादव दूध डेअरी आणि स्नॅक्स सेंटर आहे. याच परिसरात राहणारा मनोजकुमार यादव हॉटेलमध्ये नाश्ता करून जायचा, मात्र पैसे उधारी ठेवत होता. मात्र गेले काही दिवसांपासून तो हॉटेलमध्ये न आल्याने त्याच्या उधारीचे पैसे हॉटेल मालकाला मिळत नव्हते.
उधारीचे पैसे मागितले म्हणून यादव संतापला
दोन दिवसांपूर्वी मनोज जाधव हा हॉटेल समोरून जाताना हॉटेल मालकाला दिसला असता, हॉटेल चालक राजेंद्र यांनी त्याच्याकडे नाश्त्याचे उधारीचे पैसे मागितले. उधारीचे पैसे मागितल्याने मनोज यादव संतापला. त्याने राजेंद्र यादव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. मनोजने राजेंद्र यांना मारहाण करत त्याच्याजवळ असलेल्या चाकू बाहेर काढला. त्यांच्या खांद्यावर आणि पायावर वार केले.
या हल्ल्यात राजेंद्र हे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आहेत. तर हल्ल्यानंतर मनोजकुमार यादव हा पसार झालाय. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.