भीमाशंकरचं दर्शन घेऊन आले, जेवताना घरी वाद झाला, मग खोलीत गेले अन्…
साप्ताहिक सुट्टीनिमित्त भीमाशंकरचे दर्शन घेऊन आले. मग रात्री घरी जेवायला बसले असता वाद झाला. त्यानंतर ते आपल्या खोलीत गेले अन् अनर्थच घडला.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ माजवणारी घटना उघडकीस आली आहे. पुणे पोलीस दलातील एका पोलिसाने जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. विशाल माने असं मयत पोलिसाचे नाव आहे. काल रात्री राहत्या घरातच माने यांनी जीवन संपवले. विशाल पिंपरी परिसरात कुटुंबियांसोबत राहायचे. माने यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतेदह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
सध्या भोसरी पोलीस ठाण्यात कार्यरत
विशाल माने हे आई-वडिल, पत्नी आणि मुलांसह पिंपरी परिसरात राहत होते. विशाल 2013 साली पोलीस भरती झाले. सध्या ते भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. सध्या शाळेला सुट्टी असल्याने विशालची पत्नी मुलांना घेऊन तिच्या माहेरी रहायला गेली होती. घरी आई-वडिल आणि विशाल तिघेच होते.
जेवून खोलीत गेले, मग थेट मृतदेहच आढळला
काल विशालची साप्ताहिक सुट्टी असल्याने ते भीमाशंकर येथे दर्शनाला गेले होते. तिथून ते घरी परतले, त्यानंतर रात्री जेवताना त्यांचा वाद झाला. मग जेवून ते स्वतःच्या खोलीत गेले. काही वेळाने आईने त्यांना आवाज दिला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दरवाजा उघडून पाहिले असता आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. विशाल यांचा मृतदेह खोलीत होता. दरम्यान, विशालने नेमके कोणत्या वादातून हे पाऊल उचलले हे अद्याप कळू शकले नाही.