दुर्गा पूजेला द्यायचा होता बकऱ्याचा बळी, पण चिमुकल्यालाच…
झारखंडमधील लालपूर गावात आज दसऱ्यानिमित्त दुर्गा पूजा सुरु होती. येथील प्रथेनुसार दुर्गा पूजेदरम्यान बकऱ्याचा बळी दिला जात होता.
झारखंड : देशभरात आज दसरा सण उत्साहात पार पडत आहे. प्रत्येक प्रदेशातील रितीरिवाजानुसार देशबांधव हा सण साजरा करत आहेत. मात्र झारखंडमध्ये (Jharkhand) या सणाला गालबोट लागले आहे. एक अतिशय दुर्दैवी घटना (An unfortunate incident during Dussehra) दसरा सणादरम्यान घडली आहे. झारखंडमधील परंपरेनुसार दुर्गा पूजेदरम्यान (Durga Pooja) बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार बकऱ्याचा बळी देत असताना अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे.
दुर्गा पूजेदरम्यान दिला जात होता बकऱ्याचा बळी
झारखंडमधील लालपूर गावात आज दसऱ्यानिमित्त दुर्गा पूजा सुरु होती. येथील प्रथेनुसार दुर्गा पूजेदरम्यान बकऱ्याचा बळी दिला जात होता. मात्र याच दरम्यान बळी देण्यासाठी घेतलेले हत्यार तुटले अन् तेथे उपस्थित असलेल्या एका तीन वर्षाच्या गळ्यावर पडला.
रुग्णालयात नेत असतानाच मुलाचा मृत्यू
या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
परंपरेनुसार बकऱ्यांचा बळी जात होता
लालपूर गावात सालाबादप्रमाणे यंदाही परंपरेप्रमाणे दुर्गा पूजेदरम्यान बकऱ्याचा बळी दिला जात होता. दोन बकऱ्यांचा बळी देण्यात आला आणि तिसऱ्या बकऱ्याचा बळी देण्यासाठी वार करणार तेवढ्यात हत्यार तुटले.
बळी देत असताना हत्यार तुटले…
तुटलेले हत्यार उडाले आणि थेट तीन वर्षाच्या बालकाच्या गळ्यावर पडले. या घटनेत बालक गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घाघरा पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
झारखंडमध्ये बळी प्रथा अधिक मानतात. सण-उत्सवादरम्यान देवीच्या देवळात बळी देण्याची प्रथा आहे. याशिवाय नवस पूर्ण झाल्यानंतरही बळी देण्याची परंपरा आहे. मात्र ही परंपरा आज एका चिमुकल्याच्या जीवावर बेतली आहे.