पालकांनो सावधान ! अल्पवयीन मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले, केवळ डोंबिवलीतूनच ‘इतक्या’ मुली गायब
डोंबिवली शहरातून एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलांचे गायब होण्याचे प्रमाण वाढले असताना, केवळ डोंबिवलीतून चार पोलीस ठाण्याअं
डोंबिवली : सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या डोंबिवली परिसरातून गेल्या दीड वर्षात 93 मुली गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. डोंबिवली पोलिसांनी यापैकी 84 अल्पवयीन मुलीचा शोध घेतला असून, 9 मुली अजूनही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आई वडिलांनी मुलीबरोबर मित्र-मैत्रीण बनून तिची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यामुळे पालकांनी आपल्या मुलांना समजून घ्यावे, त्यांचे मित्र-मैत्रिणी बनून त्यांच्याशी वागावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पालकांनी आपली मुलं शाळेत किंवा कॉलेजमध्ये काय करतात, त्यांचे विचार काय आहेत याबाबत लक्ष देण्याची गरज असल्याचेही पोलिसांनी म्हटलं आहे.
चार पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण 148 मुले गायब
डोंबिवलीत मानपाडा, विष्णुनगर, टिळकनगर आणि डोंबिवली रामनगर असे चार पोलीस ठाणे आहेत. या चार पोलीस ठाण्यात गेल्या दीड वर्षात 148 मुले गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात 93 अल्पवयीन मुली आणि 55 मुलांचा समावेश आहे. यापैकी डोंबिवली पोलिसांना 84 अल्पवयीन मुली आणि 54 मुलांना शोधून काढण्यात यश आले आहे.
अद्याप 9 अल्पवयीन मुली आणि एक मुलगा अजूनही गायब असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र पोलिसांना कौटुंबिक वाद, नैराश्य, अल्पवयीन भूलथापा तसेच लग्नाचे प्रलोभन, प्रेम प्रकरण यामुळे ही अल्पवयीन मुलं-मुली घरातून निघून जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. डोंबिवली पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत तांत्रिक तपासाच्या आधारे मुलांचा शोध घेत त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले आहे.
कल्याण परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या पथकांनी मुलांचा शोध घेतला.