Amaravati Youth Drowned : अमरावतीत शहानूर नदीत तरुण वाहून गेला, धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीला मोठा पूर
शहानूर धरणातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शहानूर धरणाचे चार दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे शहानूर नदीला मोठा पूर आला आहे.
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील उमरी गावात शहानूर नदी (Shahanur River)च्या पुरात एक तरुण (Youth) वाहून गेल्याची घटना आज दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. गजानन साहेबराव स्वर्गे (36 रा. उमरी इतबारपूर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती कळताच दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, तहसीलदार योगेश देशमुख व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. यासह अमरावती येथील रेस्क्यू टीमला सुद्धा पाचारण करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार तो दूरवर वाहत गेला असल्याची शंका आहे. रेस्क्यू टीम (Rescue Team) घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी नदीपात्रात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केले आहे.
शहानूर धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीला पूर
शहानूर धरणातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शहानूर धरणाचे चार दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे शहानूर नदीला मोठा पूर आला आहे. उमरी येथील पुलावरून पाणी वाहत असताना या व्यक्तीचा पाय घासरून नदीत पडला आणि वाहून गेला. दर्यापूर तालुक्यातील उमरी, राजखेड, येवदा आदी गावांना पुराचा फटका बसला असून तेलखेडा, घोडचंदी, राजखेड व येवदा या गावांमध्ये रहिवासी भागात पाणी शिरले आहे. उमरी गावात जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने दर्यापूर प्रशासनाने जेसीबीच्या माध्यमातून या पुलाखाली अडकलेला कचरा काढण्याचे काम सुरू केले होते. हे काम सुरू असताना उमरी गावामध्ये पायदळ नदीपात्र ओलांडून जात असणारा गजानन स्वर्गे हा तरुण पाय घसरून नदीपात्रात पडला आणि तेथून वाहून गेला. या इसमास वाचवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही युवकांनी नदीपात्रात उड्या सुद्धा घेतल्या. मात्र सदर व्यक्ती त्यांना सापडला नाही. (A young man was swept away in the river Shahanur in Amravati)