Ambernath Murder : तरुणाला पोत्यात भरून दगड बांधून तलावात फेकलं, तरुणाच्या हत्येनं अंबरनाथमध्ये खळबळ
संपूर्ण विवस्त्र अवस्थेत असलेला हा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या पोत्यात गुंडाळण्यात आला होता. तसंच हा मृतदेह पाण्यात फेकल्यानंतर तो वर येऊ नये, यासाठी प्लॅस्टिकच्या तीन गोण्यांमध्ये मोठमोठे दगडं भरून या गोण्या मृतदेहाला बांधण्यात आल्या होत्या.
अंबरनाथ : एका 20 वर्षीय तरुणाची हत्या (Youth Murder) करून त्याचा मृतदेह (Deadbody) पोत्यात भरत त्याला दगडं बांधून तलावात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. आठवडाभरात झालेल्या या दुसऱ्या हत्येनं अंबरनाथ शहरात खळबळ माजली आहे. विशाल राजभर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया केल्यानंतर आज पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा आणि क्राईम सीन (Crime Scene) रिक्रिएशन केलं. यावेळी पोलिसांसह या गुन्ह्यात पोलिसांना मदत करणाऱ्या स्थानिक समाजसेविका जयश्री गुप्ता आणि अन्य स्थानिक रहिवासी उपस्थित होते. या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून, पोलिसांपुढे आता या हत्येच्या आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान आहे.
मृतदेह पाण्यातून वर येऊ नये म्हणून दगड बांधले होते
अंबरनाथच्या जावसई गावाजवळ डिफेन्स कॉलनीच्या मागच्या बाजूला तलाव आहे. या तलावात एक मृतदेह टाकण्यात आल्याचं स्थानिकांना गुरुवारी संध्याकाळी आढळून आलं. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या साहाय्यानं हा मृतदेह बाहेर काढला. यावेळी एका 20 ते 25 वर्षांच्या तरुणाचा हा मृतदेह असल्याचं समोर आलं. संपूर्ण विवस्त्र अवस्थेत असलेला हा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या पोत्यात गुंडाळण्यात आला होता. तसंच हा मृतदेह पाण्यात फेकल्यानंतर तो वर येऊ नये, यासाठी प्लॅस्टिकच्या तीन गोण्यांमध्ये मोठमोठे दगडं भरून या गोण्या मृतदेहाला बांधण्यात आल्या होत्या. मात्र मृतदेह पाण्यात फुगल्यानं त्याचं डोकं पाण्याबाहेर आलं आणि ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आली. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढून मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. या मृतदेहाबाबत आसपासच्या परिसरात चौकशी केली असता हा मृतदेह उल्हासनगरच्या हनुमान नगर टेकडी परिसरात राहणाऱ्या विशाल राजभर या तरुणाचा असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (A youth was killed and his body thrown into a lake for unknown reasons in Ambernath)