तुम्हीही मॅट्रीमोनियल साईटवरुन लग्न जुळवताय का?, मग ही बातमी आधी वाचा अन्यथा…
मॅट्रीमोनियल साईटवर लग्न जुळले. लग्न ठरल्यानंतर तरुण होणाऱ्या पत्नीला रिसॉर्टवर घेऊन गेला. मग जे घडले त्यानंतर तरुणीवर पश्चातापाची वेळ आली.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मॅट्रोमोनियल साईटवरुन लग्न जुळवणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. लग्न ठरल्यानंतर होणाऱ्या नवऱ्याने लॉजवर नेत तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर घरी येऊन तरुणाने तरुणीशी लग्न करण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या आळंदी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कुटुंब हे उच्चशिक्षित असून, नुकतंच तरुण आणि तरुणीचे लग्न जुळले होते. परंतु, या घटनेमुळे हे प्रकरण आता थेट पोलिसांमध्ये पोहोचले आहे.
आरोपी दुबईत योगा शिक्षक आहे
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा दुबईत असतो. तिथे योगासनाचे धडे देतो. मॅट्रीमोनियल साईटवर दोघांची भेट झाली. मग दोन्ही कुटुंब एकत्र आले. उच्चशिक्षित असलेल्या दोन्ही कुटुंबाच्या संमतीने हा विवाह देखील ठरला होता. यानंतर तरुणाने तरुणीला कर्जत येथे भेटण्यास बोलावलं. विवाह ठरला असल्याने तरुणीही बिनधास्त त्याला भेटायला गेली. तरुणाने कर्जत येथील एक रिसॉर्ट बुक केले होते. या रिसॉर्टवर तो तरुणीला घेऊन गेला.
रिसॉर्टवर नेऊन तरुणीवर बळजबरी
रिसॉर्टमध्ये दारुच्या नशेत त्याने तरुणीवर बळजबरी केल्याचं उघड झाले आहे. तरुणाचे आई-वडील हे डॉक्टर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून लग्न जुळवताना शहानिशा करूनच लग्न जुळवावे असे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे. पोलिसांनी आरोपी तरुण देवदत्त भारदेसह त्याचे डॉक्टर आई-वडील, बहिणीचा पती आणि अन्य एका महिलेवर फसवणुकीचा गुन्हा केला आहे.