सोने व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक, लुटीसाठी चोरट्यांची शक्कल पाहून हैराण व्हाल !
एका एक्झिबिशनमध्ये फिर्यादी आणि आरोपीची ओळख झाली. मग आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. मग लुटून पळाला.
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध झवेरी बाजारात एका सोने व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन हजारांच्या नोटबंदीचा फायदा घेऊन सोने व्यापाऱ्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फिर्यादीच्या तक्रारीवरुन लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 409, 420, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत संशयित इसमाचा शोध घेत पोलिसांनी राजस्थानमधून आरोपींना अटक केली. पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. हुकूमसिंह जेलसिंग राजपूत आणि छत्तरसिंग राजपूत अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 35 लाख रुपये हस्तगत केले आहेत.
दागिने बनवून देतो सांगत फसवणूक
झवेरी बाजार येथे यशोदा जगदीश अँड सन्स नावाचे सोने व्यापाऱ्याचे दुकान आहे. या दुकान मालकाला 50 लाखांचे दागिने बनवून देतो, असं सांगून ऑर्डर द्यायच्या आधी 42 लाख व्यापाऱ्याकडून घेतले. मग पैसे घेऊन आरोपी राजस्थानमध्ये फरार झाले. आरोपीनी फिर्यादी यांच्याकडून सर्व नोटा जाणूनबुजून 2 हजारच्या स्वीकारल्या होत्या. 2 हजारांच्या नोटा घेऊन पसार झाल्यास पोलीस तक्रार होणार नाही, असा आरोपींचा भ्रम होता.
हैदराबादमध्ये ज्वेलरी एक्झिबिशनमध्ये ओळख
फिर्यादी हे 19 मे रोजी हैदराबादला ज्वेलरी एक्झिबिशनसाठी गेले होते. तेथे त्यांची आरोपी हुकूमसिंह याच्याशी भेट झाली. हुकूमसिंहने आपण सोने व्यापारी असल्याचे सांगत फिर्यादी यांना विविध दागिन्यांच्या डिझाईन्सचे फोटो दाखवले. मग दागिने खरेदी करणार का असे विचारले. सदर डिझाईन्स आवडल्याने फिर्यादीने 50 लाखांच्या दागिन्यांच्या ऑर्डर्स दिल्या. यानंतर 22 मे रोजी आरोपीने फिर्यादींना फोन करत दागिने तयार असल्याचे सांगत पैशांची मागणी केली.
एक तासात ऑर्डर आणून देतो सांगत पैसे घेऊन पसार
फिर्यादीने ऑर्डर मिळाली की पैसे देतो सांगितले. मात्र हुकूमसिंहने त्यांचा विश्वास संपादन करत आधी काही रक्कम दिली तरच ऑर्डर पाठवणे शक्य असल्याचे सांगितले. फिर्यादीनेही त्याच्यावर विश्वास ठेवून ऑर्डर घेण्यापूर्वी 42 लाख रुपये आणि उर्वरीत ऑर्डरनंतर देण्याचे ठरले. त्याप्रमाणे हुकूमसिंह याने आपला माणूस दुकानात पाठवला.
फिर्यादीने त्याच्याकडे 42 लाख रुपयांच्या 2 हजाराच्या नोटा दिल्या. सदर इसमाने एक तासात ऑर्डर आणून देतो सांगितले. पण एक तास उलटूनही ऑर्डर मिळाली नाही. त्यामुळे फिर्यादीने हुकूमसिंह आणि पैसे नेण्यास आलेल्या इसमाला फोन लावला. मात्र दोघांचेही फोन बंद होते. फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.