आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक, वक्फ बोर्ड भ्रष्टाचार प्रकरणी एसीबीची कारवाई
छापेमारीत 12 लाख रुपये आणि एक विना परवाना पिस्तुल जप्त केले. दिल्ली वक्फ बोर्ड प्रकरणात एसीबीने छापे टाकले आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीच्या अँटी करप्शन ब्युरोने (ACB) शुक्रवारी आम आदमी पार्टीचे (आप) आमदार अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. याआधी एसीबीने त्यांच्या घरावर आणि त्याच्या इतर 5 ठिकाणी छापे (Raid) टाकले. छापेमारीत 12 लाख रुपये आणि एक विना परवाना पिस्तुल जप्त केले. दिल्ली वक्फ बोर्ड प्रकरणात एसीबीने छापे टाकले आहेत. दिल्ली वक्फ बोर्ड भरतीतील कथित अनियमिततेची चौकशी करत आहे.
दोन वर्षे जुन्या प्रकरणी छापेमारी
दोन वर्षे जुन्या भ्रष्टाचार प्रकरणी एसीबीने गुरुवारी ओखला विभागातील आमदार खान यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. खान यांना 2020 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात शुक्रवारी दुपारी 12 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष खान यांनी या नोटीसबद्दल ट्विट केले होते आणि दावा केला होता की, त्यांनी वक्फ बोर्डाचे नवीन कार्यालय सुरू केल्यामुळे त्यांना बोलावण्यात आले आहे.
खान यांच्याशी संबंधित पाच ठिकाणी छापेमारी
शुक्रवारी खान यांच्या घर आणि त्याच्या इतर ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. या छापेमारीत एका ठिकाणाहून 12 लाख रुपये रोख, एक विना परवाना शस्त्र आणि काही काडतुसे जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वक्फ बोर्डाच्या मालमत्तांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप
वक्फ बोर्डाच्या मालमत्तांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. खान यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून 32 जणांना कामावर ठेवल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर वक्फ बोर्डाची मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा आणि वक्फ खात्याच्या व्यवस्थापनात आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आहे.
खान यांच्या कार्यालयातून कागदपत्रे सापडली
चौकशीनंतर एसीबीच्या पथकाने खान यांच्या सुमारे पाच ठिकाणी छापेमारी केली. या छाप्यात खान यांच्या घरातून आणि कार्यालयातून काही कागदपत्रे सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.