श्रद्धा वालकर हत्याकांड, 1 डिसेंबरला होणार आफताबची नार्को टेस्ट; कोणता खुलासा होणार?
1 डिसेंबरला सकाळी 9 वाजता आफताबला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर अगोदर आफताबची मेडिकल तपासणी केली जाईल.
दिल्ली : श्रद्धा हत्याकांड प्रकरणी श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आणि हत्येतील आरोपी आफताब पुनावाला याची 1 डिसेंबर रोजी नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नार्को टेस्ट करण्याआधी सकाळी वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यानंतर तिहार तुरुंगातून दिल्ली पोलिसांची तिसरी बटालियन सकाळी साडे सातच्या सुमारास आफताबला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे.
नार्को टेस्टआधी मेडिकल तपासणी होणार
1 डिसेंबरला सकाळी 9 वाजता आफताबला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर अगोदर आफताबची मेडिकल तपासणी केली जाईल. आफताबची पूर्ण आरोग्य तपासणी झाल्यानंतर आफताबची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे.
पॉलिग्राफ टेस्टनंतर आफताबचे वर्तन सामान्य
तिहारच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबची पॉलिग्राफ टेस्ट झाल्यानंतर आफताबचं वर्तन सामान्य आहे. कारागृहात आल्यानंतर तो जेल मॅन्युअलनुसार दिलेले जेवण जेवला.
श्रद्धाविषयी बोलल्यास भडकतो
आफताबच्या सेलमध्ये, 2 अंडरट्रायल कैदी चोरीच्या प्रकरणी तिहार तुरुंगात बंद आहेत. त्यांच्याशी बोलताना आफताबने जेलच्या जेवणाच्या दर्जाविषयी चर्चा केली. मात्र, जेव्हा हे कैदी त्याला श्रद्धाच्या हत्येविषयी विचारतात तेव्हा त्याला राग येतो. तो या कैद्यांना या विषयावर बोलणार नाही असं सांगतो.
वारंवार जबाब बदलत असल्याने नार्को टेस्ट करणार
श्रद्धा हत्याकांड उघडकीस आल्यानंतर आफताब पुनावाला याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आफताबची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. मात्र आफताब वारंवार आपला जबाब बदलत होता.
हत्याकांड प्रकरणी ठोस माहिती मिळवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबची नार्को टेस्ट करण्यासाठी न्यायालयाने परवानगी मागितली. न्यायालयाने आफताबच्या नार्को टेस्टला परवानगी दिल्याने 1 डिसेंबर रोजी ही नार्को टेस्ट करण्यात येणार आहे.
आफताबच्या नार्को टेस्टमध्ये कोणता नवा खुलासा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.