गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्यापुढे कुणी मोठा नाही, 20 वर्षे पोलिसांना दिला चकमा, पण अखेर ‘असा’ अडकला जाळ्यात
दोघेजण व्यावसायिक खरेदीसाठी मुंबईत आले होते. विलेपार्लेतील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. मात्र दुसऱ्या दिवशी आरोपीने मित्राला संपवल्याचे उघड झाले. त्यानंतर तब्बल 20 वर्षे आरोपी पोलिसांना चकमा देत होता.
मुंबई : आरोपी कितीही हुशार असला तरी कानून के हाथ लंबे होते है, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. मित्राची हत्या करुन 20 वर्षे पोलिसांनी चकमा देणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी गाठलेच. कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी आरोपीने नाना युक्त्या केल्या. पण अखेर ते मुंबई पोलीस आहेत. तब्बल 20 वर्षानंतर पोलिसांनी आरोपीला शोधून काढले आणि बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी जवळपास वीस वर्षानंतर एका आरोपीला अटक केली आहे. ज्याने एका कापड व्यावसायिकाची हत्या केली होती. आरोपी यादरम्यान आपलं नाव बदलून राहत होता.. त्याने अनेक व्यवसायही बदलले पण तरी देखील पोलिसांनी त्याला हेरलेच. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागणार आहे.
20 वर्षापूर्वी झाली होती हत्या
मुंबईच्या विलेपार्ले रेल्वे स्टेशन समोर नेस्ट हॉटेलमध्ये ही हत्येची घटना वर्ष 2003 मध्ये घडली होती. कापड व्यावसायिक दीपक राठोड आणि रुपेश राय हे दोघे 2003 मध्ये व्यवसायच्या संदर्भात मुंबईत आले होते. त्यांना काही व्यावसायिक खरेदी करायचे होते. मुंबईत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या वेटरने त्यांच्या रूमचा दरवाजा साफसफाई करण्यासाठी बेल वाजवली. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही.
मित्राची हत्या करुन आरोपी फरार होता
यानंतर मास्टर चावीने वापर करून दरवाजा उघडण्यात आला. आत जाऊन पाहिले तर दीपक राठोडचा मृतदेह पडला होता. तर त्याच्यासोबत आलेला रुपेश रायहा फरार झाला होता. याबाबत सांताक्रूझ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. यानंतर 20 वर्ष पोलीस आरोपी रुपेश राय याचा शोध घेत होते. मात्र तो हाती लागत नव्हता.
‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात
पोलिसांनी आपला तपास सुरु ठेवला होता. आरोपी सतत आपले ठिकाणे बदलत होता. गुजरात, भाईंदर, रांची, गोवा या ठिकाणी जाऊन त्याने नोकरी केली. रांची येथे त्याने खाणीत काम केलं तर गोव्यात तो हॉटेलमध्ये वेटरची नोकरी केली. रुपेश राय हा मूळचा बिहार राज्यातील मुझफरपूर जिल्ह्यातील आहे. गेल्या वीस वर्षांत सांताक्रूझ पोलिसांच्या टीम अंदाजे 15 ते 16 वेळा मुझफरपूर येथे जाऊन आली. सहायक पोलीस निरीक्षक तुषार सावंत हे 15 दिवस मुझफरपूर येथे राहिले. यावेळी त्यांनी महत्वाची लीड मिळवली. यानंतर रुपेश राय हा सापडण्याची आशा निर्माण झाली, मग ते मुंबईत परत आले.
पोलीस टीमला आरोपी रुपेश हा ठाणे येथे एका मिठाईच्या दुकानात काम करत असल्याची माहिती मिळाली. मग पोलिसांनी पाळत ठेवून त्याला अटक केली. रुपेश राय आपलं नाव बदलून राहत होता. त्याने आपलं नाव अतुल विजय केडीया ठेवलं होतं. याच नावाने त्याने आधार कार्डही बनवलं होतं. त्याने पासपोर्टसाठीही अर्ज दिला होता. मात्र, त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली. जवळपास 20 वर्ष चाललेल्या या तपासाला सांताक्रूझ पोलिसांनी अखेर पूर्णविराम दिला.