तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेलीय… 8 कॉल आणि हार्ट अटॅक; ही घटना ऐकून तुम्हीही हादराल
आग्र्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक शिक्षिकेला तिच्या मुलीच्या संदर्भात फेक कॉल आला. मुलाने हा कॉल फेक असल्याचं सांगितलं. आईचं बहिणीशी बोलणंही करून दिलं. पण ही महिला मानसिक धक्क्यातून काही बाहेर आली नाही. हा धक्का इतका जबर होता की महिलेला हार्ट अटॅक आला. त्यातच तिचा मृत्यू झाला.
आग्र्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक शिक्षिका सायबर गुन्ह्याची शिकार झाली आहे. सायबर गुन्हेगारांनी केलेल्या एका कारनाम्यामुळे या शिक्षिकेला हार्ट अटॅक आला. त्यातच तिचा मृत्यू झाला आहे. 30 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. मालती वर्मा असं या 58 वर्षीय शिक्षिकेचं नाव आहे. मालती यांना व्हॉट्सअपवर एक फेक कॉल आला. तुमची मुलगी चुकीच्या कामात फसली आहे. तिला वाचवण्यासाठी एक लाख रुपये द्या, असं समोरच्या व्यक्तीने सांगितलं. मालती यांनी ही गोष्ट मुलाला सांगितली. हा फेक कॉल असून असं काही नसल्याचं मुलानं मालती यांना समजावलं. पण मालती यांना फेक कॉल खराच वाटला. त्यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यानंतर अवघ्या चार तासात त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
मालती वर्मा या आग्र्याच्या राजकीय कन्या ज्युनिअर हायस्कूल अछनेरा येथे शिक्षिका होत्या. त्यांना कॉल करणाऱ्याने आपण पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं. तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये पकडली आहे. तिला वाचवायचं असेल तर एक लाख रुपये पाठवा, असं कॉल करणाऱ्याने सांगितलं. या फेक कॉलमुळे मालती प्रचंड घाबरली. त्यांनी लगेच मुलगा दिव्यांशूला पैसे पाठवण्यास सांगितलं. विशेष म्हणजे या सायबर गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश घातलेला डीपी लावून मालती यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल करू आणि तिला तुरुंगात डांबू, अशी धमकीही त्याने दिली होती.
मानसिक तणावर सुरू
या एका खोट्या कॉलने ठगांनी मालती वर्मा यांना चार तास मानसिक रुपाने कैद केलं होतं. या काळात मालती यांना सलग आठ फोन आले. हे बनावट कॉल आहेत हे दिव्यांशूला माहीत होतं. त्याने आईला पूर्ण समजावण्याचा प्रयत्न केला. बहीण व्यवस्थित आणि सुरक्षित असल्याचंही सांगितलं. बहिणीशीही संपर्क साधला. व्हिडिओ कॉलवरून बहीण सुरक्षित असल्याचं आईला दाखवलं. ती कॉलेजात असल्याचंही दिसलं. यानंतरही मालती या मानसिक तणावातून बाहेर पडल्या नाहीत. त्यांना मुलीची चिंता लागून राहिली होती.
घरी आल्या आणि खेळ खल्लास
शाळेतून घरी आल्यानंतर मालती यांची तब्येत बिघडायला लागली. कुटुंबाने त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. चार तासानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा त्यातच मृत्यू झाला. या घटनेनंतर मालती वर्मा यांच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. त्यांचा मुलगा दिव्यांशू, नवरा शिवचरण सिंह आणि सून रेखा यांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहोत. दोषींच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करणार आहोत, असं आग्र्याचे एसपी मयंक तिवारी यांनी सांगितलं.