पत्नीने इन्स्टाग्रामवर मैत्री केली, मग घरी बोलवून पतीने व्हिडिओ बनवला, पुण्यात हनीट्रॅप
इन्स्टाग्रामवर महिलेशी मैत्री करणे एका उद्योजकाला चांगलेच महागात पडले आहे. आधी मैत्री मग घरी बोलावले. त्यानंतर आपल्या जाळ्यात अडकवले.
पुणे : पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे हनीट्रॅपची एक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने इन्स्टाग्राममधून ओळख झालेल्या एका उद्योजकाला घरी बोलावले. त्यानंतर महिलेच्या पतीने सदर उद्योजकाचा व्हिडिओ काढून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळली. मात्र त्यानंतर देखील वारंवार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रुपये खंडणीची मागणी केल्याने उद्योजकाने पोलिसात धाव घेतली. यानंतर शिक्रापूर पोलिसांनी बंटी-बबलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूनम परशुराम वाबळे आणि परशुराम अंकुश वाबळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
इन्स्टाग्रामवर उद्योजकाशी ओळख झाली
शिक्रापूर येथे राहणाऱ्या पूनम वाबळे या महिलेची इंस्टाग्रामच्या माध्यमातून कुरकुंभ येथील उद्योजक राहुल झगडे या इसमाशी ओळख झाली. त्यानंतर दोघे मैत्रीच्या भावनेतून बोलू लागले. यादरम्यान पूनम हिने राहुलला घरी बोलावले. दोघे घरी बोलत असताना पूनमचा पती परशुराम याने दोघांचा बोलताना व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून घेतला. त्यांनतर परशुराम याने मला एक कोटी रुपये दे नाही तर मी हा व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी दिली. त्यावेळी राहुल याने 25 हजार रुपये फोन पे द्वारे परशुराम यांना पाठवले.
पैसे दिल्यानंतरही पैशाची मागणी करत होती
मात्र त्यानंतर देखील पुन्हा परशुराम हा वारंवार फोन करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. त्यानंतर 23 मे रोजी पूनम वाबळे हिने राहुल यास फोन करुन तू शिक्रापूरमध्ये ये आपण हा विषय संपवून टाकू, असे म्हणून बोलावून घेतले. त्यानंतर तिने राहुलला मी व्हिडिओचा विषय संपवून टाकते, तू मला पाच लाख रुपये अन्यथा एक फ्लॅट दे असे म्हणून खंडणी मागितली.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अखेर घडलेल्या प्रकाराबाबत राहुल संभाजी झगडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी पूनम परशुराम वाबळे आणि परशुराम अंकुश वाबळे या बंटी-बबलीवर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहेत.