जिंदाल आगप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, भीषण आग प्रकरणी दोषी कोण? चौकशी अहवालात धक्कादायक बाब
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानुसार नुकतीच चौकशी पार पडली आहे. यामध्ये कंपनीतील एकूण सात जण दोषी आढळून आले आहे. त्यानुसार घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी : नववर्षाचे एकीकडे स्वागत होत असतांना नाशिकच्या घोटी जवळील जिंदाल कंपणीला ( Fire News ) मोठी आग लागली होती. त्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. तर 22 हून अधिक कामगार जखमी झाले होते. जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत स्फोटही झाले होते. त्यामुळे सलग तीन ते चार दिवस ही आग धुमसत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी याप्रकरणी स्वतः पाहणी करून चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर नुकतीच चौकशी पूर्ण झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
01 जानेवारीला नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली होती. आगीची भीषणता मोठ्या प्रमाणात असल्याने तीन दिवस ही आग सुरू होती. यामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाल्याने चौकशी करण्यात आली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानुसार नुकतीच चौकशी पार पडली आहे. यामध्ये कंपनीतील एकूण सात जण दोषी आढळून आले आहे. त्यानुसार घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंदाल कंपनीच्या आगीत ज्यांचा मृत्यू झाला त्यावेळी घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला होता. त्यामध्ये जवळपास दीड महिन्यानंतर चौकशी पूर्ण झाली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी ही चौकशी पूर्ण केली आहे. यामध्ये औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग, नाशिक यांच्याकडे पत्रव्यवहार करून अहवाल मागविण्यात आले होते.
याशिवाय कंपनीचे सेफ्टी ऑडिट रिपोर्ट मागविण्यात आले होते. त्यामध्ये जिथे सुरुवातीला आग लागली होती तो बॅच पॉली प्लॅन्टमध्ये लागली तो प्लॅन्ट जवळपास दीड महिन्यांपासून बंद होता.
त्यामुळे प्लॅन्ट सुरू करत असतांना त्याची तपासणी आणि एसओपी पालन करणे महत्वाचे होते. त्यामध्ये सुरू करत असतांना थर्मिक फ्लुईड ऑइल त्यातून बाहेर आले आणि आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यानुसार कामगारांच्या मृत्यूला आणि दुखापतीला जिंदाल पॉली फिल्म प्रा. लि. कंपनीचे भोगवटादार, फॅक्टरी मॅनेजर, पॉली फिल्म प्लॅन्ट बिजनेस हेड, प्रोडक्शन मॅनेजर, मेन्टेन्सस विभाग प्रमुख, प्रोडक्शन डिपार्टमेंट शिफ्ट इंचार्ज आणि प्लॅन्ट ऑपरेटर यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
चौकशी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या चौकशीनंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घोटी पोलीस ठाण्यात गुरनं 85/2023 भादवि कलम 304 अ, 337, 338, 285 287 आणि 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.