Ahmednagar Car Hit : अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले अन् कार थेट चहाच्या दुकानात घुसली, पण…
धंतोले कुटुंब औरंगाबादहून मारुती सुझुकी वॅगनार कारने मुंबईच्या दिशेने चालले होते. समृद्धी महामार्गावरून ते नगर मनमाड महामार्गावर उतरले आणि त्यानंतर समृद्धीच्या ब्रीज खालून नगर-मनमाड महामार्गाहून पुणतांबा फाट्याच्या दिशेने जात होते.
कोपरगाव / अहमदनगर : कोपरगाव तालुक्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना उघडकीस आली आहे. कोकमठाण शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट एका चहाच्या दुकानात घुसली. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांच्याच काळजात धस्स झाले. मात्र सुदैवाने या घटनेत दुकान चालक तरुण थोडक्यात बचावला असून, कारमधील तिघेजण जखमी झाले आहेत. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. समृद्धी महामार्गाच्या ब्रीजखाली नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे नगर-मनमाड महामार्गावरील या परिसरात वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अपघातात कारमधील तिघे जखमी
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील तीनचारी जवळ नगर मनमाड महामार्गावर असलेल्या सक्षम टी हाऊस नावाची चहाची टपरी आहे. या टपरीमध्ये सकाळच्या सुमारास एक भरधाव कार घुसून कारमधील तिघं जण जखमी झाले. यात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.
औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने चालली होती कार
धंतोले कुटुंब औरंगाबादहून मारुती सुझुकी वॅगनार कारने मुंबईच्या दिशेने चालले होते. समृद्धी महामार्गावरून ते नगर मनमाड महामार्गावर उतरले आणि त्यानंतर समृद्धीच्या ब्रीज खालून नगर-मनमाड महामार्गाहून पुणतांबा फाट्याच्या दिशेने जात होते.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घडला अपघात
याच दरम्यान ब्रीजखाली असलेल्या खड्ड्यांमध्ये त्यांची गाडी आदळली आणि चालकाचा ताबा सुटल्याने ती कार जवळच असलेल्या ईजगे यांच्या चहाच्या टपरीत घुसली. यामध्ये कारमधील चालकासह तीन जण जखमी झाले आहेत. तर चहाच्या टपरीत असलेला तरुण अनिरुद्ध वाल्मिक इजगे हा सुखरुप बचावला आहे.
सुदैवाने चहावाला तरुण सुखरुप बचावला
सुदैवाने टपरीजवळ असलेल्या लाकडी दांडक्यात कारचे मागील चाक अडकल्याने या अपघातातून तो बचावला आहे. यात कारचे आणि टपरीचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटना घडल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका संघटक देवा लोखंडे आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले
जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. समृद्धी महामार्गाच्या ब्रिजखाली मोठमोठे खड्डे असल्याने त्या ठिकाणी छोटे-मोठे अपघात दैनंदिन घडत आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने तसेच एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून ते खड्डे बुजवावे अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.