अखेर तिला न्याय मिळालाच… 9 वर्षानंतर आरोपी दोषी सिद्ध, पण पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रेच्या मृतदेहाचं काय झालं?
अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्यानंतर तब्बल 22 महिन्यांनी, मुंबई पोलिसांनी हे प्रकरण उलगडले. अश्विनी आपल्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, असे अभयने पोलिसांना सांगितलं. पण आपली इमेज जपण्यासाठी अभयहा त्याची पत्नी आणि मुलांना सोडण्यास तयार नव्हता. अखेर..

Ashwini Bidre Case : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अश्विनी बिद्रेच्या हत्येप्रकरणी मुंबई पुलिसातील इनस्पेक्टर अभय कुरुंदकरना दोषी ठरवण्यात आलं आहे. लिव-इन पार्टनर अश्विनी बिद्रेची हत्या आणि तिचे तुकडे करून ते फेकून देण्यात आले. पोलिसांच्या तपासानंतर कुरुंदकर यांना न्यायालयाने 9 वर्षांनी दोषी ठरवलं असून 11 एप्रिल रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती.
पनवेल सत्र न्यायालयात खटला सुरू होता. 9 वर्षांनंतर न्यायालयाने इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर यांना हत्येचा दोषी ठरवले. कुरुंदकर यांना मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करणाऱ्या इतर दोघांनाही पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. आता त्यांना काय शिक्षा ठोठावण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याच कुरुंदकर यांना 2017 साली राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल न्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केले.
काय आहे प्रकरण ?
कुरुंदकर यांचं महाराष्ट्र पोलिसात मोठं नाव होतं, त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले. त्यांचा पूर्वी वेगळाच प्रभाव होता. मात्र एक दिवस असं काही घडलं की त्याच पोलिस इन्स्पेक्टरला अटक झाली आणि जेलमध्ये पाठवण्यात आलं. हे प्रकरण ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर यांनी जे केलं ते अतिशय भयानक होतं. त्याच्यासोबत काम करणारी महिला पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हितच्या ते प्रेमात पडले. दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पण एके दिवशी अचानक अश्विनी बेपत्ता झाली. अभय देखील तिच्या बेपत्ता होण्याचे नाटक करत राहिला. त्यानंतर पोलिस तपासात असे दिसून आले की अभयने मृतदेहाचे छोटे तुकडे करून झुडपात फेकून दिले होते. सर्व प्रयत्न करूनही, अश्विनीच्या शरीराचे तुकडे आजपर्यंत सापडलेले नाहीत. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अभय कुरूंदकर दोषी ठरले असले तरी अश्विनीचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही.
कोल्हापूरची रहिवासी होती अश्विनी
अश्विनी बिद्रे ही कोल्हापूरची रहिवासी होती. 2005 साली तिचं लग्न राजू गोरे नावाच्या इसमाशी झालं. लग्नाच्या दोन वर्षांनी तिने महाराष्ट्र पीएससी उत्तीर्ण केली आणि पोलिसात सब-इन्स्पेक्टर झाली. तिचं पहिलं पोस्टिंग पुण्यात झालं. तीन वर्षांनंतर, अश्विनीची सांगलीला बदली झाली. तिचा नवरा राजू गोरे आणि दीड वर्षाची मुलगी सांगलीला आले.
पहिल्याच पोस्टिंगमध्ये पडली प्रेमात
अश्विनी हिची तिचे ज्येष्ठ सहकारी अभय कुरुंदकर यांच्याशी भेट झाली. ते दोघेही मित्र बनले आणि नंतर प्रेमात पडले. त्यांचे अफेअर चालूच होते. 2013 मध्ये, अश्विनीची पोस्टिंग रत्नागिरी येथे झाली. अभय अश्विनीला भेटण्यासाठी 170 किमी अंतरावर असलेल्या रत्नागिरीला येऊ लागला. अभय कुरुंदकरचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुलंही आहेत. पण तरीही अश्विनी -अभयने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2014 मध्ये अश्विनी तिच्या पतीपासून वेगळी झाली. त्यानंतर अश्विनी आणि अभय दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. अश्विनीच्या पतीला हे माहित होते पण अभयच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याची माहिती नव्हती. ती तिच्या मुलीला भेटण्यासाठी अधूनमधून तिच्या पती राजूच्या घरी जात असे, पण काही दिवसांनी तिने तिथे जाणेही बंद केले. अभय आणि अश्विनी नवी मुंबईत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. 2015 मध्ये, अश्विनीला बढती मिळाली आणि ती सहाय्यक पोलिस निरीक्षक बनली.
दोन महिन्यांनी मिळाली बेपत्ता झाल्याची बातमी
अश्विनी तिच्या फ्लॅटवरून स्कूटरने ऑफिसला जायची. 11 एप्रिल 2016 रोजी ती अचानक बेपत्ता झाली. 15 एप्रिल रोजी तिचा भाऊ आनंदच्या फोनवर मेसेज आला की ती काही कामासाठी उत्तर प्रदेशला गेली आहे आणि एका आठवड्यानंतर परत येईल. पण त्या लोकांनी लक्ष दिले नाही. 2 महिन्यांनंतर, अचानक अश्विनीच्या वडिलांना नवी मुंबई पोलिस मुख्यालयातून मोबाईलवर फोन आला आणि त्यांच्याकडे अश्विनीबद्दल चौकशी करण्यात आली. अश्विनी दोन महिन्यांपासून कामावर आली नाही, असे त्यांना सांगण्यात आलं. पण कोल्हापुरात राहणाऱ्या अश्विनीच्या कुटुंबाला याबद्दल काहीच माहिती नव्हते.
चेन्नईवरून भाऊ आला
अश्विनीचा भाऊ आनंद चेन्नईमध्ये काम करत होता. त्याला वडिलांनी फोन केला आणि अस्विनी बेपत्ता झाल्याबद्दल सांगितलं. ते ऐकून तो लगेच चेन्नईहून नवी मुंबईला पोहोचला. अश्विनीचा शोध सुरू झाला पण काहीही सापडले नाही. जुलै 2017 मध्ये, आनंदने अश्विनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अश्विनीचा माजी पती राजू गोरे याची चौकशी केली. तेव्हाच पोलिसांना अभय आणि अश्विनी यांच्यातील संबंधांची माहिती मिळाली.
लॅपटॉपमधून मिळाला अभयविरुद्ध पुरावा
पोलिसांनी अभयची चौकशी केली पण त्यांना काहीच सापडले नाही. त्यानंतर अश्विनीच्या लॅपटॉपमधून काही पुरावे सापडले ज्यावरून दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. पोलिसांना लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओही सापडला ज्यामध्ये अभय अश्विनीला मारहाण करताना दिसला होता. 10 महिन्यांच्या तपासानंतर अखेर अभयने शरणागती पत्करली आणि अश्विनीचा खून केल्याची कबुली दिली.
22 महिन्यांनी झाला खुलासा
अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्यानंतर तब्बल 22 महिन्यांनी, मुंबई पोलिसांनी हे प्रकरण उलगडले. अश्विनी आपल्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, असे अभयने पोलिसांना सांगितलं. पण आपली इमेज जपण्यासाठी अभय हा त्याची पत्नी आणि मुलांना सोडण्यास तयार नव्हता. याच मुद्यावरून झालेल्या भांडणादरम्यान अभयने अश्विनीचा खून केला. कुऱ्हाडीने तिचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत फेकून दिले.
याप्रकरणी पनवेल कोर्टात खटला सुरू होता, अखेर 9 वर्षांनी अभयला न्यायालयाने दोषी ठरवले असून आता 11 एप्रिलला त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.