मोठी बातमी: अभिनेता दिनो मोरियावर ‘ईडी’ची कारवाई; सव्वा कोटींची संपत्ती जप्त
Dino Morea | ईडीने या दोघांची अनुक्रमे 1.4 कोटी आणि 2.41 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. गुजरातमधील उद्योजक संदेसरा बंधूंनी तब्बल 14500 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन एका बँकांना चुना लावला होता.
मुंबई: संदेसरा घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अभिनेता दिनो मोरिया आणि अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी या दोघांवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने या दोघांची अनुक्रमे 1.4 कोटी आणि 2.41 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. गुजरातमधील उद्योजक संदेसरा बंधूंनी तब्बल 14500 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन एका बँकांना चुना लावला होता. याप्रकरणाच्या तपासादरम्यान इरफान सिद्दीकी आणि दिनो मोरिया (Dino Moria) यांचेही आर्थिक लागेबांधे असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे ‘ईडी’कडून गुन्हेगारी स्वरुपात मोडणाऱ्या आर्थिक व्यवहाराइतक्या रक्कमेची संपत्ती जप्त केल्याचे समजते. (Assets Of Actor Dino Morea Ahmed Patel’s Son In Law Seized In Fraud Case)
स्टर्लिंग बायोटेक कंपनीच्या चेतन संदेसरा, नितीन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा यांनी बनावट कंपन्या स्थापन करुन बँकांकडून कर्ज घेतले होते. या कंपन्यांसाठी संदेसरा बंधुंनी आंध्रा बँक, युको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या परदेशातील शाखांमधून कर्ज घेतले होते. या माध्यमातून त्यांनी बँकांना तब्बल 14500 कोटी रुपयांचा चुना लावला होता. त्यानंतर 2017 मध्य संदेसरा बंधूंनी भारतामधून पलायन केले होते.
ईडीच्या तपासात दिनो मोरिया आणि इरफान सिद्दीकी यांनी संदेसरा बंधुंशी आर्थिक व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे ईडीकडून या दोघांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते.
काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरी ED चा छापा
गेल्यावर्षी ईडीने याप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरावरही छापा टाकला होता. स्टर्लिंगच्या एका संचालकांनी चौकशीत सांगितले होते की, “चेतन संदेसरा आणि गगन धवन अनेकवेळा पटेल यांच्या जावयाच्या घरी पैशांनी भरलेल्या बॅग घेऊन जात असत. चार-पाच वेळा मी स्वत: त्यांच्याबरोबर होतो. एकावेळी 15-25 लाख रुपये देण्यात येत. चेतन संदेसरा अनेकदा अहमद पटेल यांच्या अधिकृत निवासस्थानी (23 मदर क्रेसेंट, नवी दिल्ली) भेट देत असत. सांदेसरा बांधव कोड वर्डमध्ये त्याला मुख्यालय 2′ असे म्हणत. इरफान सिद्दीकी यांना संदेसरा बंधू जे 23 आणि फैजल पटेल जे 1 म्हणून संबोधत.
(Assets Of Actor Dino Morea Ahmed Patel’s Son In Law Seized In Fraud Case)