अंडरवर्ल्डशी संबंध समोर आल्यानंतर प्रयागराजमध्ये धक्कादायक घटना, अतिक अहमद आणि अशरफ दोघांना आयुष्यातून उठवलं
उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
प्रयागराज : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अतीक आणि अशरफ या दोघांना मेडिकलसाठी पोलीस गाडीतून नेलं जात होतं. यावेळी दोघांवर गोळीबार झाला. या गोळीबारात अतीक आणि अशरफ दोघांचा मृत्यू झाला आहे. या भयानक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अतिक आणि अहमद दोघांची हत्या झाली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे पोलिसांनी नुकतंच अतिक अहमद याचा मुलगा असद याचे एनकाऊन्टर केलं होतं. त्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकारणदेखील तापलं होतं. या प्रकरणी तपास पुढे सरकला असता पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात अतिकचं अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शनही तपासात पुढे आलं. याबाबतचं वृत्त आज समोर आलं होतं. त्यानंतर आज रात्री अतिशय निर्घृणपणे दोन्ही भावांची पोलिसांच्या गाडीत असताना हत्या करण्यात आली आहे.
मीडियाला बाईट देत असतानाच गोळीबार
तीन लोकांनी अतिक आणि अशरफ या दोन्ही भावांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून वेगाने तपास सुरु करण्यात आला आहे. प्रयागराजच्या मेडिकल कॉलेजजवळ दोघांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे अतिक मीडियाला बाईट देत असतानाच गोळीबार करण्यात आला.
तपासात आज नेमकी काय माहिती समोर आली?
पोलिसांच्या चौकशीत अतिक अहमद याने महत्वाची माहिती दिली होती. त्याने उमेश पालची हत्या कशी केली, कारागृहातून कशी सूत्रे हलवली, मोबाइल फोन अन् सीमकार्ड कसे मिळवले? ही सर्व माहिती अतिकने पोलिसांना दिली. अतिकने कारागृहातील एका सरकारी अधिकाऱ्याचे नावही सांगितले, ज्याच्या मोबाईल फोन आणि सीमकार्ड तुरुंगात पोहोचवण्याचे काम केले. बरेली तुरुंगात बंद असलेला त्याचा भाऊ अशरफ यालाही शाइस्ता परवीनने मोबाईल आणि सीम पुरवल्याचे अतिकने सांगितले.
डॉन मुख्तार अन्सारीच्या मदतीने अतिक अहमद दाऊद टोळीच्या संपर्कात आला. यानंतर अतिक टोळीने पाकिस्तानातून शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू केला. असद अन् गुलाम यांच्यांसोबत झालेल्या चकमकीत विदेशी शस्त्रे जप्त झाले. यामुळे आता एनआयए सुद्धा अतिकच्या तपास करू शकते.
उमेश पाल खून प्रकरणानंतर असद आणि गुलाम यांना सुरक्षित ठेवणे हे अतिकसाठी आव्हान बनले होते. मग अतिकने डॉन अबू सालेमच्या जवळच्या व्यक्तींशी अन् माजी खासदार असलेल्या एका मोठ्या राजकारण्याशी त्याने संपर्क केला. असद आणि गुलाम यांची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली. त्यासाठी अबू सालेमने मदत केल्याचे वृत्त आहे.
आतिकचा भाऊ अशरफ आणि इंटरनॅशनल डॉन अबू सालेम यांचे चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे असद आणि गुलामला पुण्यात सालेमच्या जवळच्या लोकांसोबत राहण्याची व्यवस्था केली गेली. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेम तुरुंगात आहे. त्याचे नेटवर्क महाराष्ट्रात अजूनही सक्रिय आहे. अबू सालेमच्या सांगण्यावरुन अश्रफला पुण्यात आश्रय दिला गेला होता, अशी माहिती आहे.