गर्लफ्रेन्डवर 3 कोटी उधळणारा भामटा अखेर गजाआड! कोणंय माहितीये?
गर्लफ्रेन्डवर 3 कोटी उधळणाऱ्या भामट्याचं थेट मुंबई कनेक्शनही समोर! वाचा, अटकेचा सिनेस्टाईल थरार
उत्तर प्रदेश : गर्लफ्रेन्डवर 3 कोटी रुपये उधळणाऱ्या अय्याश भामट्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. या भामट्याचं नाव बजरंग बहादूर उर्फ सावन सिंह असं आहे. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन त्याच्या मुसक्या आवळल्या. एका टाटा सफारी कारमधून सावन सिंह हा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी आधीच सापळा रचलेला. पण गाडी न थांबवता त्याने पळ काढला. अखेर पोलिसांनी सावन सिंह याचा थरारक पाठलाग करुन त्याला बेड्या ठोकल्यात.
एटीएममध्ये फेरफार करुन अनेकांची सानव सिंह यांने फसवणूक केली होती. पोलिसांच्या चौकशीत त्याचं मुंबई कनेक्शनही समोर आलंय. सावन सिंह हा मुंबईतून एक गँग ऑपरेट करत होता. देशभर त्याची माणसं एटीएम फ्रॉड करुन लोकांना चुना लावत होती, असंही तपासातून समोर आलंय.
मूळचा प्रतापगड जिल्ह्यातील असणारा बजरंग बहादूर उर्फ सावन सिंह हा जेठवार येथील राहणारा आहे. गँगचा म्होरक्या असलेल्या सावन सिंह याने कानपूर विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षणही घेतल्याची माहिती उघडकीस आलीय.
बार गर्लफ्रेन्डवर 3 कोटी रुपये उधळल्यामुळे तो चर्चेत आला होता. त्याला 2020 साली अटकही करण्यात आली होती. त्याच वेळी पोलिसांच्या चौकशीत त्याने ही अजब गोष्ट कबूल केली होती.
अय्याशी करणं, पैसे उधळणं, महागड्या गोष्टींचा नाद या सवयींमुळे तो पोलिसांच्या रडारवर आला होता. त्याने अनेकांना गंडवलं असून एटीएम बदलून फ्रॉड करणारी गँग तो चालवतो. ही गँग संपूर्ण देशभरात सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे.
देशभरात जिथे कुठेही एटीएम फ्रॉड होते, तो बहादूरच्या गँगचीच माणसं करतात आणि या फ्रॉडची एक ठराविक रक्कम ही थेट बहादूर याला पोहोचवली जाते, असंही समोर आलंय. या पैशांतून तो अय्याशी करायचा आणि गर्लफ्रेन्डवर पैसे उधळत होता, असंही तपासाअंती उघडकीस आलंय.
26 ऑगस्ट रोजी बजरंग बहादूर उर्फ सावन सिंह हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. बजरंगसोबत त्याच्या अन्य साथीदारांच्या पोलीस मागावर होती. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना सावन सिंहचा ठिकाणा लागला होता. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.
एका नंबर प्लेट तुटलेल्या टाटा सफारी कारमधून सावन सिंग जात होता. ही कार पोलिसांनी नाकाबंदी करुन अडवण्याचा प्रयत्न केला. पण नाकाबंदी तोडून सावन सिंह याने धूम ठोकली.
अखेर पोलिसांनी या टाटा सफारी कारचा सिनेस्टाईल पाठलाग केला. या पाठलागादरम्यान, बजरंग बहादूर उर्फ सावन सिंग याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याची रवानगी पुन्हा कोठडीत करण्यात आलीय. पोलीस आता या गँगच्या इतर साथीदारांच्या शोधात आहेत.