औरंगाबादः वडिलांच्या निधनानंतर आईने दुसरे लग्न केले. मुलगा आजीकडे राहू लागला. वृद्ध आजीचेही त्याच्या वर्तणुकीकडे फारसे लक्ष राहिले नाही. परिणामी कोवळ्या वयातच मुलगा गुन्हेगारी (Crime) क्षेत्राकडे वळला. चोरी, घरफोडी आणि जुगाराचे सहा गुन्हे दाखल असलेल्या अल्पवयीनाचा (Minor boy)अंतही अत्यंत करुण पद्धतीने झाला. मित्रानेच चाकूने सपासप वार करून या अल्पवयीनाचा खून केला. बायजीपुऱ्यात घडलेल्या या घटनेनं औरंगाबादमध्ये (Aurangabad) खळबळ माजली. शाहरूख शेख अन्वर असं या अल्पवयीनाचं नाव असून घराजवळील दुभाजकावर मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या मित्रानेच त्याला चाकूने भोसकले. रक्ताच्या थारोळ्यात शाहरूखला तेथेच सोडून मित्र थेट पोलीस ठाण्यात पोहोचला.
शाहरुख आणि आरोपी हैदर खान ऊर्फ शारेख जाफर खान हे रात्री गप्पा मारत दुभाजकावर बसले होते. तेव्हा शिवीगाळ केल्याने त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हैदरने कमरेला लावलेला चाकू काढून शाहरूखच्या छाती, पोट, पाठ आणि डाव्या पायाच्या मांडीवर वार केले. यात तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला. यानंतर हैदर रक्ताने माखलेल्या कपड्यांसह जिन्सी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने शाहरुख नावाच्या तरुणाने आपल्यावर हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितले.
हैदरने सांगितलेल्या घटनेनुसार, जिन्सी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी शाहरुखला घाटीत दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपी हैदरदेखील या भांडणात जखमी झाल्याने त्याच्यावर घाटीत उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सोमवारी सकाळी शाहरुखचे मामा पठाण जावेद यांनी दिलेल्या तक्रारीवरून हैदरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.