Aurangabad | मला ‘देवगिरी’सारखे करायला भाग पाडू नको, वाळूज परिसरात एकतर्फी प्रेमातून धमकी, औरंगाबादेत तरुण-तरुणींमध्ये असुरक्षितता!
ती त्याला भाऊ मानत होती. मात्र तरुणाने तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला सुरुवात केली. काही दिवसांनी त्याने तिला इतर मुलांसोबत बोलायचे नाही, असा हट्ट सुरु केला.
औरंगाबादः शहरातील देवगिरी कॉलेजमधील (Deogiri Collage) विद्यार्थिनी कशिशची एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्यानंतर तरुण-तरुणींमध्ये (Collage students) दहशतीचं आणि असुरक्षिततेचं (Insecurity) वातावरण आहे. शहरात सातत्याने खून आणि मारहाणीच्या घटना घडत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. कॉलेज आणि कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांनाही गुंडांच्या टोळक्याकडून मारहाणीच्या घटना घडत आहेत. वाळूज परिसरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीला ओळखीच्याच तरुणाने धमकावल्याची माहिती समोर आली आहे. आधी ही तरुणी त्याला भाऊ मानत होती, मात्र नंतर त्याने तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला सुरुवात केली. याला विरोध केल्यानंतर तरुणीला त्याने धमकी दिली. मला ‘देवगिरी’सारखं करायला भाग पाडू नको, अशा शब्दात तिला भीती घातली. या प्रकरणी तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आङे.
कुठे घडला प्रकार?
शहरातील फार्मसी कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. याविषयी सविस्तर माहिती असी की, काही दिवसांपूर्वी सदर तरुणी आणि तिच्या मित्राची ओळख झाली. ती त्याला भाऊ मानत होती. मात्र तरुणाने तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला सुरुवात केली. काही दिवसांनी त्याने तिला इतर मुलांसोबत बोलायचे नाही, असा हट्ट सुरु केला. तिने हा प्रकार प्राचार्यांना सांगितला. त्यामुळे रागावलेल्या तरुणाने तिला ‘मला देवगिरी महाविद्यालयात जसे घडले, तसे करायला भाग पाडू नको’ अशी धमकी दिली. तरुणीने पुन्हा प्राचार्यांकडे तक्रार केली. कॉलेज व्यवस्थापनाने खबरदारी म्हणून दामिनी पथकाला कळवलं. तसंच मुलीच्या वडिलांनाही हा प्रकार कळवून कुटुंबाला ठाण्यात जाण्यास सांगितलं. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
हाडको उद्यानात तरुणावर चाकूने हल्ला
शहरात घडलेल्या आणखी एका घटनेत टीव्ही सेंटर भागातील स्वामी विवेकानंद उद्यानात तरुणावर चाकूने हल्ला झाला. 29 मे रोजी उद्यानात रात्री नऊ वाजेपर्यंत वैभव बांगर हा तरुण मैत्रिणीसोबत बसला होता. यावेळी पाठीमागून दोन तरुण तिथे आले. त्यांनी वैभवचा मोबाइल उचलला. वैभवतो तो परत मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर चाकूने वार केले. तरुण आणखी वार करण्याच्या तयारीत असतानाच वैभव मैत्रिणीला घेऊन उद्यानाच्या बाहेर आला. रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी प्राथमिक उचपार केले व दुसऱ्या हॉस्पिटलला जाण्यास सांगितले. त्यानंतर बीड बायपास येथील रुग्णालयात वैभववर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याने सिडको पोलिसांना जबाब दिला. त्यावरून सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.