महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येनंतर अयोध्येत आणखी एका साधूचा संशयास्पद मृत्यू, मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू
उत्तर प्रदेशात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर अयोध्येत आणखी एका साधूची संशयास्पद मृत्यूची बातमी समोर आली आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर अयोध्येत आणखी एका साधूची संशयास्पद मृत्यूची बातमी समोर आली आहे. अयोध्येतील एका मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने साधुचं निधन झालं आहे. मृतक साधुचं नाव मणिराम दास असं आहे. दास यांनी आत्महत्या केली की दुसरं काही घडलं? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पोलिसांनी दास यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत.
मृतक साधू गेल्या काही दिवसांपासून नैराश्याने त्रस्त
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृतक साधू हे गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होते, अशी माहिती समोर आली आहे. पण ते नेमके नैराश्यात का होते? या मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस सध्या मंदिर प्रशासन आणि इतर साधूंकडून माहिती घेत आहेत. याशिवाय पोलीस दास यांचे फोन रेकॉर्डही चेक करत आहेत.
साधू, महंतांमध्ये शोकाकूळ वातावरण
दरम्यान, या घटनेमुळे अयोध्येतील साधू, महंतांमध्ये शोकाकूळ वातावरण आहे. मणिराम गेल्या काही दिवसांपासून खूप कमी बोलत होते. याशिवाय ते हल्ली एकटेच राहणं पसंत करत होते. ते आपल्या खोलीत एकटेच राहत होते.
महंत गिरी यांची आत्महत्या
दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महंत गिरी यांच्या आत्महत्येची घटना समोर आली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली होती. त्यामध्ये त्यांनी आपले शिष्य आनंद गिरी, आध्या तिवारी आणि संदीर तिवारी यांच्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी तीनही जणांना अटक केली आहे.
शिष्य म्हणाला, हा कोट्यवधींचा खेळ
दरम्यान, सुसाईड नोटच्या आधारावर नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरीची चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान, नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याची शक्यता त्याने नाकारली आहे. तो म्हणाला की, प्रयागराजचे आयजी यात संशयित आहे, ते सतत नरेंद्र गिरी यांच्या संपर्कात असायचे. आनंद गिरीने आरोप केला की, मठ आणि मंदिराजवळ असलेली संपत्ती हडपण्यासाठी महंत नरेंद्र गिरी यांची हत्या झाली. या कटात अनेक मोठे मासे गुंतलेले असू शकतात. हा कोट्यवधींचा खेळ आहे. विशेष गोष्ट म्हणजे, नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी, आद्या तिवारी आणि संदीप तिवारी यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या: