Baba Siddiqui Murder : ‘ऑसिफिकेशन टेस्ट’मुळे बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याची पोलखोल; काय असते ही चाचणी ?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी हत्या झाली. रविवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या हत्याकांडातील एक आरोपी धर्मराज कश्यपने अल्पवयीन असल्याची बतावणी केली होती. त्याची ऑसिफिकेशन टेस्ट केल्यानंतर सत्य समोर आलं. काय असते 'ऑसिफिकेशन टेस्ट'?
माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आत्तापर्यत तीन आरोपींना अटक केली आहे. धर्मराज कश्यप , गुरनैल सिंह आणि प्रवीण लोणकर अशी त्यांची नावे असून धर्मराज आणि गुरनैले हे गोळीबार करणारे आरोपी आहेत तर प्रवीण लोणकर हा शुभम लोणकरचा भाऊ आहे. बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारल्यासंदर्भातील एक पोस्ट शुभम याने फेसबूकवर पोस्ट केली होती. सध्या पोलिस याप्रकरणाचा आणखी तपास करत इतर तीन आरोपींच्या शोधात आहेत. फरार आरोपी शिवा गौतम, झिशान अख्तर आणि शुभम लोणकर या तिघांच्या शोधात पोलिसांची अनेक पथके फिरत आहे.
दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याची ऑसिफिकेशन टेस्ट ( ossification test) करणयाचे आदेश दिले. ती चाचणी झाल्यानंतर सत्य काय ते समोर आलं. ही ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे नक्की काय असतं? ते जाणून घेऊ या..
आरोपीचा दावा काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीक यांच्यावर शनिवारी रात्री तिघांनी गोळीबार करून त्यांची हत्या केली. त्यापैकी दोन हल्लेखोर पकडले गेले तर तिसरा आरोपी शिवा हा अजूनही फरार आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते. त्यावेळी धर्मराज कश्यप या आरोपीने आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला. माझ्या अशिलाचे वय 17 आहे, त्यामुळे त्याला अल्पवयीन म्हणून ग्राह्य धरावं अशी मागणी कश्यपच्या वकिलांनी केली होती. मात्र त्यानंतर न्यायालयाने धर्मकाज कश्यप याची ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे निर्देश दिले.
ऑसिफिकेशन टेस्टचा अहवाल काय ?
ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे वय निश्चितीसाठीची हाडांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर आरोपी हा अल्पवयीन नसल्याचे सिद्ध झाले. चाचणीच्या अहवालानंतर त्याला पुन्हा न्यायलयासमोर हजर करण्यात आले असता कोर्टाने कश्यप यालाही 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
काय असते ऑसिफिकेशन टेस्ट?
ऑसिफिकेशन ( ossification test) हा एक इंग्रजी शब्द असून ती एक मेडिकल प्रोसिजर आहे. एखाद्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज लावण्यासाठी हाडांच्या परिपक्वतेचे (सॅच्युरिटी) मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते. मनुष्याच्या शरीरात हाडं तयार होणं , त्या हाडांचा विकास होण याला ऑसिफिकेशन म्हटलं जात. ऑसिफिकेशन टेस्टमध्ये मानवाच्या शरीरातील हाडांच्या एक्स-रे इमजचे विश्लेषण केले जाते. विशेषतः, हात आणि मनगटांच्या वाढीच्या प्लेट्सच्या विकास आणि फ्यूजन हे ट्रॅक केले जाते. ( त्याचा मागोवा घेतला जातो). मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये ऑसीफिकेशन हाडांच्या विकासाच्या प्रगतीचा दर्शवते. काही हाडं विशिष्ट वयात कठीण होतात. एखाद्या व्यक्तीचे अचूक वय निर्धारित करण्यासाठी ही चाचणी सामान्यतः फॉरेन्सिक विज्ञान आणि कायदेशीर संदर्भांमध्ये वापरली जाते.
आरोपींच्या रिमांडसाठी पोलीसांनी दिली 9 कारणं
– माजी मंत्र्याला गोळ्या घालून ठार मारणे हा गंभीर गुन्हा आहे. त्याची सखोल चौकशी व्हायला हवी.
– अनेक लोकांसह आरोपींनी प्लान आखून हा गुन्हा केला.
– गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कोठून आणि कसे आणले याचा तपास करावा लागणार आहे.
– आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर 6 ते 7 राउंड अंदाधुंद गोळीबार केला. त्यांनी शस्त्रं वापरण्याचे प्रशिक्षण कोठून घेतले, याचा शोध घ्यावा लागेल.
– माजी मंत्र्याची हत्या का आणि कोणाच्या सांगण्यावरून झाली, याचा शोध घेण्याची गरज आहे.
– मृत व्यक्ती हे मोठे राजकीय व्यक्तिमत्व होते. त्याच्या हत्येमागचा हेतू काय?
– अटक करण्यात आलेले व फरार आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात राहत होते. स्थानिक पातळीवर त्यांना कोण मदत करत होते?
– आरोपींकडून प्रत्येकी दोन फोन जप्त करण्यात आले आहेत. त्यांचा वापर कसा केला जात होता, याचीही चौकशी व्हायला हवी.
– बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी तीन सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते, घटनेच्या वेळी दोन सुरक्षा कर्मचारी त्यांच्यासोबत होते, तिसरा सुरक्षा कर्मचारी त्यांच्यासोबत नव्हता, त्यांच्याबाबतही चौकशी सुरू आहे.
हत्येप्रकरणात समोर आलं पंजाब कनेक्शन
दरम्यान या हत्याकांडप्रकरणी यूपी आणि हरियाणापाठोपाठ आता पंजाबचेही कनेक्शन समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी झिशान अख्तर हा पंजाबमधील जालंधरचा रहिवासी आहे. त्याचे खरे नाव मोहम्मद यासीन अख्तर आहे. सर्व आरोपी मुंबईत जिशानसोबत राहत होते आणि घटनेच्या वेळी जिशान तीन शूटर्सना सूचना देत होता, अशी माहिती समोर आली आहे. हत्याकांडानंतर जिशानही तेथून पळून गेला. दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये त्याला जालंधर येथून एका खून-दरोड्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर कैथलमध्ये अटक करण्यात आलेला आरोपी गुरमेलच्या घरी गेला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे मध्य प्रदेशाशीही जोडलेले असल्याचे दिसते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलीस मध्यप्रदेशात पोहोचले आहेत. मध्य प्रदेशातून एका आरोपीचे शेवटचे लोकेशन सापडले. ओंकारेश्वर, खांडवा, उज्जैन येथे आरोपींचा शोध सुरू आहे.