Baba Siddiqui Death: पित्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बनला गँगस्टर, जेलमध्ये लॉरेन्स बिश्नोईशी भेट, बाबा सिद्दीकी यांचा चौथा मारेकरी झिशान आहे तरी कोण ?
Zeeshan Akhtar : मुंबईतील बाबा सिद्दीकींच्या हत्येतील चौथा आरोपी झीशान अख्तर याचा थेट कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंध आहे. लॉरेन्स याच्या जवळची व्यक्ती असलेल्या विक्रम ब्रारमुळे तो लॉरेन्सच्या संपर्कात आला. लॉरेन्सने बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी झिशानवर दिली होती. त्यानेच ही हत्या करणाऱ्या तीन शूटर्सना या कामावर ठेवलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री हत्या झाल्यानंतर प्रचंड खळबळ माजली. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी वाँटेड असलेला चौथा गुन्हेगार झीशान अख्तर हा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा हस्तक आहे. पंजाबमधील जालंधर येथील रहिवासी असलेल्या झिशानला लॉरेन्सने सहा महिन्यांपूर्वी बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी दिली होती. त्यावेळी तो पंजाबच्या पटियाला तुरुंगात होता. तुरुंगातून सुटल्यानंतर झीशानने तीन शूटर्सना ठेवलं आणि चार महिन्यांच्या तयारीनंतर सिद्दीकी यांची हत्या केली. सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एक गुरमेल हा हरियाणातील कैथलचा रहिवासी असून तो झिशानचा जुना साथीदार आहे,अशी माहिती समोर आली आहे.
जालंधर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झीशानला 2022 मध्ये खून आणि खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो एका परदेशी नंबरवर व्हॉट्सॲप वापरत होता. तो फक्त दहावीपर्यंत शिकलेला आहे. झीशानचे वडील मोहम्मद जमील आणि त्याचा भाऊ टाईल्सचे कंत्राटदार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई याचा जवळचा साथीदार विक्रम ब्रार याने 2021 मध्ये जालंधरच्या ड्रग्स माफिया रानो याच्याकडे खंडणी मागितली होती. मात्र रानो याने खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यानंतर विक्रमने 3 सप्टेंबर 2021 मध्ये झिशना अख्तर, अंकुश पाइया, विशाल सभरवाल, रोहित आणि बॉबी यांना पाठवून रानोच्या घरावर गोळीबार केला होता. याप्रकरणी झिशान याला तुरूगांची हवा खावी लागली होती.
वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बनला गँगस्टर
झिशान अवघ्या 21 वर्षांचा असून त्याच्याविरोधात अर्ध्या डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खून, दरोडा, लूटमार याशिवाय खंडणीच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. जालंधर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन-चार वर्षांपूर्वी जीशानच्या वडिलांच्या दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाने फोन चोरून बाजारात विकला होता. ही बाब त्याच्या वडिलांना कळताच त्यांनी आरोपीला खडसावले. यानंतर त्या मुलाने त्याच्या साथीदारांसह मिळून झीशानच्या वडिलांना मारहाण केली आणि त्यांची दाढीही खेचली
वडिलांचा झालेला हा अपमान झिशानला सहन झाला नाही, त्याचाच बदला घेण्यासाठी त्याने 2019 साली पहिला गुन्हा केला. यादरम्यान त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्रम ब्रारशी ओळख झाली. विक्रम ब्रारच्या आदेशावरूनच झीशानने तरनतारन मध्ये पहिला खून केला.
वयाच्या 9 व्या वर्षी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका मदरशात झीशान याने दीड वर्ष अरबी, फारसी आणि उर्दूचे शिक्षण घेतले होते. यानंतर तो यूपीतील बिजनौर येथील मदरशात शिकण्यासाठी आला. येथेही दीड वर्ष राहिल्यानंतर तो गावी परतला आणि सहावीच्या वर्गात शिक्षण घेतलं. त्याने फक्त 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं नतर तो वडिलांना व्यवसायात मदत करू लागला.