गँगस्टरांकडून ‘मोसाद’ स्टाइलचा वापर, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अंडरवर्ल्डचा असा राहिला पॅटर्न
baba siddique murder case: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमध्ये सहभागी बहराइचमधील दोन शूटर धर्मराज आणि शिवकुमार यांचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. तसेच माफिया अतिक आणि अश्रफ यांच्या शूटर्सचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती.
मायानगरी मुंबईत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. या हत्येनंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडली. ही हत्या करणाऱ्या आरोपींनी फुलप्रूफ प्लॅनिंग केले होते. या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली आहे. परंतु या हत्याकांडातील पद्धत अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. खासदार अतीक अहमद, त्यांचा भाऊ अशरफ, गँगस्टर संजीव माहेश्वरी उर्फ जीवा, मुन्ना बजरंगी यांच्या हत्येचा पॅटर्न आता बाबा सिद्दिकी हत्येत वापरण्यात आला आहे. इस्त्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ ची स्टाइल या हत्येसाठी स्वीकारली आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील दोन युवक उत्तर प्रदेशातील आहे. त्यांचे वय जवळपास 20 आहे. ते दोघे नोकरीसाठी पुण्यात जात असल्याचे घरी सांगून गेले होते. धर्मराज कश्यप आणि शिवा गौतम यांची नावे हत्या प्रकरणात आल्यानंतर त्यांच्या घरी पोलीस पोहचले. त्यांच्या बहराइच जिल्ह्यातील गंडारा गावात माध्यमांनी गर्दी केली.
मोसादच्या कार्यशैलीचा प्रभाव
राजकारणात असणाऱ्या लोकांच्या हत्येचा पॅटर्न एकसारखा होता. या हत्यांची शैली मोसाद सारखी आहे. मोसाद आपले लक्ष्य निश्चित करते, त्यासाठी नवीन आणि ज्यांच्यावर संशय येणार नाही, अशी युवकांना ती जबाबदारी देते. खासदार अतीक अहमद, त्यांचा भाऊ अशरफ, गँगस्टर संजीव माहेश्वरी उर्फ जीवा, मुन्ना बजरंगी आणि बाबा सिद्दिकी या हत्यांमागे माफियांचा हात आहे. त्या माफियांवर इस्त्रायली एजन्सी मोसदच्या कार्यशैलीचा प्रभाव दिसत आहे.
अशी आहे माफियांची पद्धत
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमध्ये सहभागी बहराइचमधील दोन शूटर धर्मराज आणि शिवकुमार यांचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. तसेच माफिया अतिक आणि अश्रफ यांच्या शूटर्सचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. संजीव माहेश्वरी हत्येप्रकरणीही आरोपींचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नव्हता. माफिया मुन्ना बजरंगी याच्या हत्या प्रकरणात गँगस्टरचे नाव आले, पण शूटरची क्रिमिनल हिस्ट्री नव्हती. यामुळे माफियांकडून स्वत: हत्या करण्याऐवजी हत्या घडवून आणली जात असल्याचा पॅटर्न अवलंबला जात आहे. त्यासाठी युवा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्यांची निवड केली जात आहे.