Badlapur News : चिडून बदलापूरकर रस्त्यावर उतरले, ते चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण नेमकं काय?
Badlapur News : बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली आहे. तिथे रेल रोको आंदोलन करण्यात आलं. बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकलीवर अत्याचार झाला. त्याविरोधात बदलापूरकरांच्या मनात चीड, संताप आहे. नेमक हे सर्व प्रकरण काय आहे? जाणून घ्या.
बदलापुरात सर्वसामान्य नागरिक आज रस्त्यावर उतरले आहेत. बदलापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. रुळावर उतरून लोकांनी स्वयंफूर्ततेने रेल रोको आंदोलन केलं. बदलापूरकरांच्या मनात इतकी चीड, संतापाची भावना आहे, त्याला कारण आहे लैंगिक अत्याचार. बदलापुरात एका नामांकीत शाळेत दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये एका स्वच्छता कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं. 12-13 ऑगस्ट रोजीची सकाळच्यावेळचे वर्ग सुरु असतानाची ही घटना आहे.
आरोपी कर्मचारी 1 ऑगस्टला कंत्राटी पद्धतीने नोकरीवर रुजू झाला होता. लेडीज टॉयलेटसाठी शाळेने एका महिलेची नियुक्ती करायला पाहिजे होती. पण पुरुष कर्मचाऱ्याला नेमलं. त्याचा या स्वच्छता कर्मचाऱ्याने गैरफायदा घेतला. शाळेतून घरी परतल्यानंतर एका मुलीने तिच्या प्रायवेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केली. कुटुंबियांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलीने शाळेच्या टॉयलेटमध्ये घडलेला प्रकार सांगितला.
दुसरी मुलगी शाळेत जायला घाबरत होती
त्या मुलीच्या पालकांनी तिच्याच वर्गात असलेल्या दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांची मुलगी सुद्धा शाळेत जायला घाबरत असल्याच समजलं. स्थानिक डॉक्टरने दोन्ही मुलींची तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच समजलं. संतप्त पालकांनी समाजसेवकाशी संपर्क साधला. तक्रार नोंदवण्यासाठी बदलापूर पूर्वेला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
पोलिसांनी काय सांगितलं?
पॉस्कोची केस असूनही पोलिसांनी तक्रार नोंदवायला उशिर लावला. शुक्रवारी रात्री गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. “आम्ही पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक तपासानंतर आम्ही आरोपीला अटक केलीय” असं सहाय्यक पोलीस आयुक्त एस.एच.वरहादे यांनी सांगितलं. शाळा व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष झाल्याच, त्रुटी राहिल्याच पोलीस तपासात समोर आलं. मुलींच्या टॉयलेटसाठी कुठल्याही महिलेची नियुक्ती केली नव्हती. शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नव्हते. यामुळे विद्यार्थी सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.