बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणाऱ्या तिघांना नाशिकमध्ये बेड्या; संशयितामध्ये दोघे अल्पवयीन

| Updated on: Nov 05, 2021 | 2:56 PM

बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या असून, त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणाऱ्या तिघांना नाशिकमध्ये बेड्या; संशयितामध्ये दोघे अल्पवयीन
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या असून, त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये 19 ऑक्टोबर रोजी बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा त्यांना यातील एका आरोपीचा सुगावा लागला. हा आरोपी अनिकेत बिअर शॉपी येणार असल्याचे समजते. याठिकाणी पोलिसांनी संशयित दुर्गेश नंदलाल कोडिले (रा. माळेगाव एमआयडीसी, मायलान कंपनीच्या मागे, बोडके वस्ती) याला बेड्या ठोकल्या. त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. 19 ऑक्टोबरच्या रात्री दोनच्या सुमारास आपण स्क्रू ड्रायव्हर आणि चाकूच्या मदतीने एटीम तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे सिन्नरकडे निघून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून नांदूरशिंगोटे बसस्थानकाजवळ कोडिले यास मदत करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे.

एटीएमचे तुकडे करून रोकड लंपास

गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून तब्बल 22 लाख 71 हजार 300 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सिन्नरमधल्या सरदवाडीत (जि. नाशिक) मध्यरात्री घडली आहे. सरदवाडी येथे हॉटेल अजिंक्यताराजवळ अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे. चोरट्यांनी या एटीमची फोडी केली. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एटीएममध्ये प्रवेश केला. आपण कुणाच्याही जाळ्यात सापडू नये म्हणून सीसीटीव्हीचे केबल कनेक्शन तोडून टाकले. त्यानंतर सोबत असलेल्या गॅस कटर मशीनने एटीएमचे तुकडे केले. शटर बंद करून चोरट्यांनी डाव साधला. रोकड लंपास केल्यानंतरही शटर बंद ठेवले. दसऱ्यादिवशी दुपारपर्यंत एटीएमचे शटर बंदच होते. मात्र, शुक्रवारी दसरा सणानिमित्त पैसे काढायचे म्हणून अनेक ग्राहक तिथे येऊन गेले. एक ग्राहक बराच वेळ थांबला. त्याने शटर वर करून पाहिले. तेव्हा एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणीही सिन्नर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सुरक्षारक्षक होता कुठे?

जिल्हा आणि तालुकास्तरावरील प्रत्येक एटीएमवर सुरक्षारक्षक शक्यतो तैनात केलेला असतो. या घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. मग या काळात एटीएमवरील सुरक्षारक्षक कुठे होता की, येथे सुरक्षारक्षकच नेमलेला नव्हता, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. पोलीस तपासात हे सारे समोर येईलच. (Bank of India ATM burglars arrested in Nashik; Both minors in the suspect)

इतर बातम्याः

केंद्र-राज्यात लसीकरणाचा वाद नाही; त्र्यंबकेश्वर येथे देवेंद्र फडणवीस यांचा दावा

NashikGold: पाडव्यादिवशी महागाईचा गोडवा; सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या!