Santosh Deshmukh Murder : बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अटक
Santosh Deshmukh Murder : सध्या सगळ्या राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे. काल सभागृहात सुद्धा हा विषय झाला. संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. आरोपी विष्णू चाटेला पोलिसांनी पकडलं आहे. या हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता चार वर गेली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी मधील आरोपी आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांची गाडी अडवली. सहा ते सात जणांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांना बेदम मारहाण करुन नंतर त्यांची हत्या करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, आता चौथ्या आरोपीला अरेस्ट केलं आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याच राजकारण तापलं आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं चार दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आलं, त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला केज शहरातील एका हॉटेलमध्ये भेटल्याच दिसत आहे.
6 डिसेंबरला काय घडलं?
6 डिसेंबरला प्रतिक घुलेसह इतर काही लोकांनी प्रकल्पस्थळी येऊन सुरेश सोनवणे, प्रकल्प अधिकारी शिवाजी शिंदेंना जबर मारहाण केली होती. या सगळ्यामध्ये 2 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर मस्साजोगचे रहिवाशी वॉचमन अशोक सोनवणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर 6 तारखेलाच केज पोलीस ठाण्यात घुलेसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याच्या 3 दिवसांनंतर सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं आणि निर्घृण हत्या करण्यात आली.
या प्रकरणात आरोपी कोण?
या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे या सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विष्णू चाटे हे राष्ट्रवादीचा तात्कालिन तालुकाध्यक्ष आहे.