औरंगाबाद : प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीला (Girlfriend) मोठा धक्का बसला. मात्र नकार पचवता न आल्यामुळे फक्त प्रेयसीच नाही, तर तिच्या मैत्रिणींनीही टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. प्रेयसीसह सहा जीवश्च-कंठश्च मैत्रिणींनी विष पिऊन आत्महत्या (Suicide Attempt) करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रेयसीसह तिघी जणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर उर्वरित तीन मैत्रिणींची तब्येत गंभीर आहे. बिहार राज्यातील (Bihar Crime News) औरंगाबादमधील कासमा भागात ही आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. प्रकृती गंभीर असलेल्या युवतींना मगध मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणीला तिच्या भावाचा मेहुणा म्हणजेच वहिनीचा भाऊ आवडत होता. त्याला प्रपोज करण्यासाठी ती आपल्या पाच मैत्रिणींना सोबत घेऊन गेली. मैत्रिणींसमोरच तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. आपल्याशी लग्न करण्याचा प्रस्तावही तिने तरुणासमोर मांडला.
प्रियकराने मात्र तरुणीशी लग्न करण्यास साफ नकार दिला आणि तो निघून गेला. नकार ऐकून हिरमुसलेल्या सहा जणी गावी परत आल्या. नाराज झालेल्या प्रेयसीने आधी विष प्यायले. आपल्या मैत्रिणीने टोकाचं पाऊल उचलल्याचं पाहून उर्वरित पाच जणींनीही तिची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एका मागून एक पाचही मैत्रिणींनी विषप्राशन केले.
मैत्रिणींनी विष प्यायल्याचा प्रकार काही वेळातच गावकऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यांनी तातडीने सहाही जणींना जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु त्यापैकी तिघी जणींनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या इतर तिघींना लगेचच मगध मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच सीओ अवधेश कुमार सिंह, ठाणाध्यक्ष राजगृह प्रसाद घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आढावा घेतला.
गावात एकाच वेळी तिघी जणींच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. त्यांच्या नातेवाईकांची रडून-रडून वाईट अवस्था झाली आहे. पोलिसांनी तिघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या :
Aurangabad Suicide | पोटच्या मुलीसह 24 वर्षीय महिलेची आत्महत्या, औरंगाबादमध्ये खळबळ
एमपीएससी परीक्षेतील अपयशामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपायाची गळफास घेत आत्महत्या
सांगलीत पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट