दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीप, एक्स बॉयफ्रेण्डला पुन्हा भेटायला बोलावलं आणि…
बिहारचा रहिवासी असलेल्या सनी दीपकची ओळख दोन वर्षांपूर्वी पाटणा शहरातील रानीघाट येथे राहणाऱ्या बाबीशी झाली होती. ओळखीचं रुपांतर आधी मैत्री आणि नंतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. काही दिवस दोघांमध्ये सर्व काही आलबेल होतं.
पाटणा : दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलेल्या तरुणीनेच तिच्या साथीदारांच्या मदतीने पूर्वाश्रमीच्या प्रियकराला लुटल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये समोर आली आहे. फिरायला जाण्याच्या बहाण्याने ती तरुणाला गंगेच्या घाटावर घेऊन गेली होती. तिथे तरुणी आणि तिच्या साथीदारांनी तरुणाला कारमध्ये बसवून शस्त्राच्या बळावर दागिने आणि मोबाईल फोन लुटला. तसेच त्याच्या बँक खात्यातील अडीच लाख रुपयांची रक्कमही दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केली. त्यानंतर धमकी देऊन आरोपींनी युवकाला सोडून दिले. पीडित सनी दीपक उर्फ कबीर याने पीरबाहोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर बाबी नावाच्या मुलीला पोलिसांनी अटक केली असून तिच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
दानापूरचा रहिवासी असलेल्या सनी दीपकची ओळख दोन वर्षांपूर्वी पाटणा शहरातील रानीघाट येथे राहणाऱ्या बाबीशी झाली होती. ओळखीचं रुपांतर आधी मैत्री आणि नंतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. काही दिवस दोघांमध्ये सर्व काही आलबेल होतं. मात्र बाबीची दुसऱ्या तरुणाशी जवळीक वाढली, तेव्हा तिने सनीला सोडून दिलं.
एक्स बॉयफ्रेण्डला पुन्हा भेटायला बोलावलं
दोन दिवसांपूर्वी तिने अचानक सनीला गांधी मैदानात भेटायला बोलावलं. दोघांनी एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र जेवणही घेतलं. नंतर, बाबी फिरत-फिरत त्याला एनआयटी गंगा घाटावर घेऊन गेली. तिथे आधीच तिचे चार -पाच साथीदार गाडीत दबा धरुन बसले होते.
कारमध्ये बसवून लूट
बाबीच्या सांगण्यावरून तिच्या साथीदारांनी जबरदस्तीने सनीला त्यांच्या कारमध्ये बसवलं. नंतर त्याच्या कपाळावर पिस्तूल ठेवून त्यांनी सनीची सोन्याची साखळी आणि आयफोन लुटला, तसेच जबरदस्तीने त्याच्या मोबाईलवरुन त्याच्या बँक खात्यातून अडीच लाख रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर करुन घेतले. लुटीनंतर बाबी आणि तिचे साथीदार सनीला कारमधून बाहेर काढून पळून गेले.
एक्स गर्लफ्रेण्डला अटक
पीरबाहोर पोलिसांनी सांगितले की, आरोपी बाबीला रानीघाट येथून अटक केली. तर तिच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. त्याच वेळी, ज्या खात्यात पैसे हस्तांतरित केले गेले होते, त्या खात्यातील उर्वरित 1.5 लाख रुपये गोठवण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
लुटीला विरोध, रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशाची हत्या, तिकीटावर नाव असलेली 15 वर्षांची मुलगी बेपत्ता
गाडीतून ऑईल गळती, लहान मुलाने गंडवलं, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने 50 लाखांची लूट टळली
Axis बँकेचा मॅनेजर, ICICI बँकेचा माजी मॅनेजर, तरीही दरोडा का टाकला?