अमृतसर : एका पोलीस अधिकाऱ्याच्या सरकारी वाहनात बॉम्ब (Bomb) असल्याची माहिती मिळताच अमृतसरमध्ये खळबळ उडाली आहे. अमृतसरमधील हायप्रोफाईल कॉलनी रणजीत एव्हेन्यू परिसरात मंगळवारी एका इन्स्पेक्टर (Inspector)च्या सरकारी वाहनात बॉम्ब ठेवण्यात आला होता. तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून प्रकरणाचा तपास सुरू केला. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून बॉम्ब ताब्यात घेतला. यादरम्यान दोन संशयित तरुण कारमध्ये बॉम्ब ठेवताना सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये कैद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा बॉम्ब अमृतसरच्या सीआयए सेलमध्ये तैनात असलेले पोलीस अधिकारी दिलबाग सिंग यांच्या कारमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, वेळीच बॉम्ब निदर्शनास आला आणि मोठा कट फसला. सध्या पोलिसांनी परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून बॉम्ब पेरणाऱ्या तरुणांचा शोध सुरू केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी हे वाहन रणजीत अव्हेन्यू येथून हटवले आहे. वाहनात सापडलेले उपकरण डिटोनेटर असू शकते. रात्री दोनच्या सुमारास ते कारमध्ये बसवण्यात आले, असे अमृतसरचे आयजी सुख चैन सिंग गोल यांनी सांगितले.
या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, यामध्ये दोन जण दुचाकीवर बसून त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक रंगाच्या बोलेरो कारखाली स्फोटके ठेवताना दिसत आहेत. सकाळी गाडी पुसण्यासाठी आलेल्या तरुणाने ही माहिती सिंग यांना दिली. या तरुणामुळेच अमृतसरमधील बॉम्बस्फोटाचा धोका टळला.
पंजाबचे पोलीस उपनिरीक्षक दिलबाग सिंग हे दहशतवादाच्या काळात अतिशय सक्रिय होते आणि त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोमवारी रात्री मोटारसायकलवरील दोघेजण सीसीटीव्हीत कैद झाले असून, पांढरे कुर्ते घातलेले दोन अनोळखी लोक कारच्या खाली बॉम्ब ठेवताना दिसत आहेत. या घटनेबाबत स्वत: एसआयने सांगितले की, त्यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्या होत्या आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. (Bomb in police officers car in Amritsar, two suspects caught on CCTV)