लेकरांची हत्या करणाऱ्या गावित भगिनींना फाशीऐवजी जन्मठेप! एक एक हत्या थरकाप उडवणारी

Crime : आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टानं मायलेकींना फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षेतून माफी मिळावी म्हणून राष्ट्रपतींकडेही दया याचना केली होती

लेकरांची हत्या करणाऱ्या गावित भगिनींना फाशीऐवजी जन्मठेप! एक एक हत्या थरकाप उडवणारी
रेणुका शिंदे, सीमा गावित
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 1:04 PM

मुंबई : अंजना गावित, रेणूका शिंदे आणि सीमा गावित ह्या तिघींवर एक नाही, दोन नाही तर 42 लेकरांचं अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप होता. अर्थातच त्यातल्या सहा लेकरांचीच हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाला. इतरांबाबत पुरावे सादर करण्यात तसच आरोपींना सजा घडवण्यात यंत्रणा कमी पडल्या. परिणामी आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टानं मायलेकींना फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षेतून माफी मिळावी म्हणून राष्ट्रपतींकडेही दया याचना केली होती. अनेक वर्ष त्यांचा दयाअर्ज राष्ट्रपतींकडे प्रलंबित असल्यानं अखेर मंगळवारी त्यांच्या शिक्षेत कपात करण्यात आली. फाशीऐवजी आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) सुनावली आहे. 2004 पासून त्यांचा दयाअर्ज राष्ट्रपतींकडे प्रलंबित होता. अत्यंत थरारक आणि राक्षसी कृत्य केलेल्या गावित भगिनींनी केलेला हत्याकांड राज्यातील थराराक हत्याकांडांपैकी एक आहे.

कशी सुरु झाली हत्याकांडाची साखळी?

ही गोष्ट घटना आहे 90 च्या दशकातली. अंजना गावित ही मूळची नाशिकची. तिचा एका ट्रक ड्रायव्हरवर जीव जडला. दोघे पळून पुण्यात आले. लग्न केलं. दोघांना एक मुलगी झाली. तिचं नाव रेणूका. काही काळ सर्व व्यवस्थित चाललं पण दिवस सारखे थोडेच रहातात. ट्रक ड्रायव्हरनं अंजना गावितला सोडून दिलं. अंजना अर्थातच रस्त्यावर आली. पदरात आता एक पोरगीही होती. पोट कसं भरायचं? छोटी मोठी कामं ती करत राहिली.

वर्षभराचा काळ निघून गेला असावा. अंजना पुन्हा एका रिटायर्ड सैनिकाला भेटली. त्यांचं नाव मोहन गावित. दोघे प्रेमात पडले. लग्न केलं. अंजनाला दुसरी मुलगी झाली. तिचं नाव सीमा. पण अंजनाचं मोहन गावितांशीही फार पटलं नाही. मोहन गावितांनीही अंजनाला सोडून दिलं. म्हणजेच अवघ्या दोन एक वर्षाच्या काळात अंजना दुसऱ्यांदा रस्त्यावर आली. तेही आणखी एका मुलीसह. म्हणजे आधीच फाटकं आयुष्य त्यात आणखी एका जीवाची भर.

आणि अंजनानं चोरी सुरु केली

दोन नवऱ्यानं सोडलेली बाई एकदम रस्त्यावर आली. खायचे वांदे झाले. आपलं आणि आपल्या दोन्ही मुलींचं पोट कसं भरायचं असा मोठा प्रश्न अंजनाबाईसमोर उभा राहीला. तिनं मेहनतीऐवजी चोरीचा मार्ग पत्करला. छोट्या मोठ्या चोऱ्या करायला लागली. कधी कुणाचं पाकिट मार तर कधी कुणाची बॅग लंपास कर. दोन्ही मुली हळूहळू मोठ्या झाल्या तसं अंजनानं त्यांनाही चोरी चपाट्या करायला शिकवलं. तिघी मिळून मग लोकांच्या पैशावर डल्ले मारायला लागल्या.

हत्या नाही क्रूर हत्या !

एके दिवशी अंजनाबाई चोरी करायला निघाल्या. त्यासाठी त्यांनी लहान लेकराचा सहारा घेण्याचं ठरवलं. त्यासाठी झोपडपट्टीत एकटच खेळत असलेलं 18 महिन्याचं एक लेकरु उचललं आणि कडेवर घेऊन चोरी करायला निघाली. एका भिकाऱ्याचं ते बाळ होतं. चोरी कुठे करावी, कुठे हात साफ करता येईल ह्याच्या विचारात असतानाच एका मंदिराजवळ तिला संधी मिळाली. एका माणसाचं अंजनानं पाकिट मारलं पण पकडली गेली. काही क्षणात तिथं गर्दी जमा झाली. त्यात काही बायकाही होत्या. त्यांनी अंजनाला झोडपायला सुरुवात केली. अंजनाजवळचं बाळ रडत होतं. त्याचं नाव संतोष होतं. गर्दी सोडतही नव्हती आणि मारही देत होती. शेवटी पोलिसांना बोलवावं लागलं. अंजनानं त्यातून सुटका करण्यासाठी थेट बाळालाच जमीनीवर आपटलं. त्यात त्या लेकराच्या डोक्याला मार लागला. त्याचं रक्त रस्त्यावर सांडलं. अंजना लेकराची शपथ घेऊन सांगू लागली की तिनं चोरी केली नाही. पण गर्दीचा विश्वास बसलेला नव्हता. आता लेकराची अवस्था बघून मात्र गर्दीचं हृदय पिघळलं. लोकांचं लक्ष आता अंजनावरुन लेकरावर केंद्रीत झालं. त्यातही काहींना वाटायला लागलं की चोरी केली नसल्याचं अंजना खरंच बोलत असणार. नाही तर ती लेकराला अशी जमीनीवर कशी आपटेल? पण गर्दीला हे कुठं माहित होतं की, ते लेकरु अंजनाचं नाहीचय. तिनं चोरी करण्यासाठी त्याचं अपहरण केलंय.

आणि संतोषला संपवलं

अठरा महिन्याच्या बाळाला जमीनवर आपटून अंजनानं स्वत:ची सुटका करुन घेतली. त्या सगळ्या अवस्थेत तिची कुणी तक्रारही केली नाही. पोलीसांनीही फार चौकशी केली नाही. गंभीर जखमी अवस्थेतलं लेकरु प्रचंड वेदनेत होतं. खूप रडत होतं. ना त्याच्या जवळ त्याची खरी आई होती ना, ह्या मायलेकी त्याला काही खाऊ घालत होत्या. सीमा अंजनाच्यासोबतच होती. लेकराचं रडण्याचा मायलेकींना वैताग आला. त्याला तसच सोबत ठेवलं तर पोलीसांची परत झंझट मागे लागण्याचीही भीती होतीच. मायलेकींनी संतोषला संपवण्याचा प्लॅन केला. जवळच्याच एका लाईटच्या खांब्याला त्या लेकराचं डोकं पुन्हा मारलं. ते बाळ जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याला आपटत राहील्या. एकदाच तो जीव शांत झाला. नंतर त्याला जवळच्याच एका जागेत डंप केलं गेलं. अशा प्रकारे अंजना गावितनं पहिला खून पचवला.

आणि लेकरांची कसाई झाली

चोरी केली, त्यातून सुटका करण्यासाठी एका लेकराची ढाल बनवली, त्याला संपवलं आणि चोरी सुकर झाली. अंजना गावितला चोरी करता करता पकडलं गेलं तर त्यातून सुटका करुन घेण्यासाठी मार्ग सापडला. मायलेकींनी मग चोरी करायला निघताना झोपडपट्टीत, रस्त्यावर चक्कर मारायच्या. एखाद्या लहान लेकराला हेरायच्या. शक्यतो ते झोपडपट्टीतलेच असायचे. कारण त्यांचं अपहरण करणं सोप्पं असायचं. त्यांच्यावर फार कुणाची पाळत नसायची. पोलिसात तक्रार होण्याची शक्यताही कमी असायची. लेकराला उचलायच्या, चोरी करायच्या, पकडलं गेलं की लेकराला जमीनीवर आपटायच्या. स्वत:ची सुटका करुन घ्यायचं. नंतर त्या जखमी लेकरालाही कायमचं संपवून टाकायच्या. हे सगळं उघडं पडेपर्यंत चालत राहीलं.

मारण्याचा भयंकर प्रकार

लेकराचा उपयोग संपला की त्याला अंजनाबाई आणि तिच्या लेकी संपवून टाकायच्या. पण त्या पद्धतीनं संपवायच्या त्यानं आताही अंगावर काटा उभा राहील. बहुतांश लेकरं त्यांनी जमीनीवर, लाईटच्या पोलवर आपटून मारुन टाकली. ती बाळं तडफडून मेली. एका लहानशा मुलीच्या तर गळ्यावर पाय ठेवून मारल्याचं तपासात उघड झालं तर एका लेकराला उलटं टांगून त्या लेकराचं तोंड पाण्यात बुडवून मारलं. चोरीपेक्षाही लेकरांचं अपह्रण करुन त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं ठार मारण्याची चटकच अंजनाबाईंना लागली. एक वेळेस तर ह्या मायलेकींनी चोरी केली. बाळाला मारलं, त्याला एका पॉलिथीनच्या बॅगमध्ये घातलं. ती बॅग घेऊन त्या सिनेमा बघायला गेल्या. आरामात सिनेमा बघितला आणि त्या मेलेल्या लेकराची बॅग बाथरुमध्ये ठेवून पसार झाल्या.

कारनामे उघड कसे झाले?

1990 ते 96 ह्या सहा वर्षाच्या काळात अंजना गावित आणि तिच्या दोन मुलींनी असं एक नाही, दोन नाही तर 42 लेकरांचं अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप ठेवला गेला. ह्यातली बहुतांश लेकरं ही झोपडपट्टीतली होती, त्यामुळे पोलीसांनीही उघड होईपर्यंत फार सक्रियता दाखवली नसल्याचं दिसतं. पण गुन्हा आहे तर तो किती काळ लपून राहणार? एक ना एक दिवस त्याची वात पेटतेच. झालंही तसंच. आणि तेही अंजनाबाईंच्या दुसऱ्या नवऱ्याच्या घरात.

अंजनाबाईंचं पितळ उघडं पडलं

अंजनाबाईंच्या दुसऱ्या नवऱ्याचं नाव होतं मोहन गावित. त्यांचीच मुलगी सीमा. वेगळं झाल्यानंतर मोहन गावित यांनी दुसरं लग्न केलेलं होतं. त्यांच्या दुसऱ्या बायकोचं नाव होतं प्रतिमा. त्यांना क्रांती नावाची एक मुलगीही होती. 1996 ला अंजनाबाई, रेणूका आणि सीमा अशा तिघी मोहन गावित यांच्याकडे रहायला आल्या. काही तरी त्यांच्यात खटपटी उडायला लागल्या. अंजनाबाई आणि त्यांच्या मुलींनी प्रतिमाला धडा शिकवायचं ठरवलं. त्यांनी क्रांतीचं अपहरण केलं. आणि नंतर हत्या केली. 9 वर्षाच्या क्रांतीचा मृतदेह जवळच्याच ऊसाच्या शेतात सापडला. क्रांतीच्या आईनं म्हणजे प्रतिमाबाईनं पोलीसात तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक तपास केला. त्यांना अंजनाबाई आणि तिच्या दोन्ही मुलींचा संशय आला. पोलीसांनी रेणूका आणि सीमा दोघींनाही आत टाकलं. पोलिसी खाक्या दाखवला. त्यांनी क्रांतीची हत्या केल्याचं कबूल केलं पण अंजनाबाईंच्या सांगण्यावरुन. तिघींनाही पोलीसांनी अटक केली. आसपासचेही काही लेकरं गायब झालेली होती. त्यांच्या तपासाचे धागेदोरेही ह्याच तिघींपर्यंत येऊन पोहचले. पण अजूनही पोलीसांच्या हाती फार ठोस असं काही नव्हतं.

रेणूकानं सगळं राज उलगडलं

ह्या सर्व काळात अंजनाबाईंची मोठी मुलगी रेणूकाचं लग्न झालेलं होतं. तिच्या पतीचं नाव किरण शिंदे. लेकरही झालेली होती. रेणूकाचा ह्या सगळ्या हत्यांमध्ये फार सहभाग नव्हता असं पोलीसांना वाटलं. त्याच जोरावर त्यांना रेणुकाला माफीची साक्षीदार व्हायला सांगितलं. ते तिच्या कसं फायद्याचं हेही समजून सांगितलं. तिनं मग हळूहळू काय काय केलं, किती लेकरांचं अपह्रण करुन खून केला सगळं सांगितलं. यावरुन तिघींनी मिळून 42 लेकरांचं अपह्रण करुन खून केल्याचं उघड झालं. अर्थात त्यातल्या बहुतांशचे पुरावे सापडले नाहीत. नंतर राज्य सरकारनं सीआयडी तपासाची घोषणा केली. खटला चालवला. 13 अपह्रणं आणि 6 खून सिद्ध झाले. हायकोर्टानं तिघींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

इतर बातम्या :

बारामतीतील सराफा व्यवसायिकाच्या कुटुंबावर काळाचा घाला ; अपघातात चौघांचा मृत्यू

Nagpur Crime | नागपुरात प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला; जखमी झालेला प्रियकर पळाला…

क्रिकेटच्या सट्ट्याने केला घात! जुगाऱ्याने अख्खं कुटुंबच संपवलं; नागपुरात नेमकं काय घडलं?

 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.