भाचीच्या हळदीचा कार्यक्रम होता, मंडपात पंगत बसली होती, अचानक सर्व पंगत सोडून पळू लागले, कारण काय?
भाचीचा हळदीचा कार्यक्रम सुरु होता. सर्व नातेवाईक हळदीचा कार्यक्रम एन्जॉय करत होते. एक बाजूला जेवणाची पंगत सुरु होती. अचानक असं काही घडलं की सर्व पाहुणे पंगत सोडून पळू लागले.
कल्याण : कल्याणमध्ये एका हळदी समारंभात धक्कादायक घटना घडली आहे. हळदी समारंभात सर्वजण हळदी समारंभ एन्जॉय करत होते. नाचगाणी सुरु होती. एकीकडे जेवणाची पंगत सुरु होती. अचानक असं काही घडलं की सर्व पाहुणे पंगत सोडून पळू लागले. हळदी समारंभातच मेव्हण्यांनी भावोजीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हल्ल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र हल्ल्यात भावोजी जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोघा मेव्हण्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण पाटील आणि राजेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर गौतम भंडारी असे हल्ल्यात जखमी झालेल्या भावोजीचे नाव आहे. खडकपाडा पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
पीडिताच्या भाचीच्या हळदी समारंभात हल्ला
गौतम भंडारी यांच्या भाचीचा हळदी समारंभ होता. यासाठी गौतम हे आपले दोघे मेहुणे नारायण आणि राजेश यांच्यासह कल्याण पश्चिम भागातील धाकडे शहाड परिसरात गेले होते. एकीकडे हळदीचा कार्यक्रम मंडपात सुरू होता, तर दुसरीकडे एका मंडपात जेवणाची पंगत बसली होती. यादरम्यान अचानक जेवणाच्या पंगतीत बसलेल्या गौतम यांच्यावर त्यांच्या मेव्हण्यांनी अचानक हल्ला केला. फायटर आणि लाकडी दांडक्याने गौतम यांना मारहाण करण्यात आली.
नातेवाईकांची जेवणाची पंगत सोडून पळापळ
जेवणाच्या पंगतीतच हल्ला झाल्याने पाहुण्यांची पंगत सोडून पळापळ झाली. नातेवाईकांनी तात्काळ गौतम यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. यानंतर तक्रारदार गौतम यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी दोन्ही हल्लेखोर मेहुण्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. या गुन्ह्याचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. गवळी करीत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार गौतम भंडारी हे कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील वडवली, आंबवली गावात राहत असून ते जिम ट्रेनर आहेत.