Nashik | गर्गे स्टुडिओ दरोडाप्रकरणी परप्रांतीय टोळीला बेड्या; 2 अल्पवयीन मुलांचा समावेश
प्रसिद्ध शिल्पकार मंदार गर्गे यांच्या स्टुडिओवर दरोडा टाकणाऱ्या परप्रांतीय चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी मुंबईत बेड्या ठोकल्या आहेत.

नाशिकः प्रसिद्ध शिल्पकार मंदार गर्गे यांच्या स्टुडिओवर दरोडा टाकणाऱ्या परप्रांतीय चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी मुंबईत बेड्या ठोकल्या आहेत. दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून महापुरुषांच्या पुतळ्यातील तब्बल 1400 किलोच्या साडेआठ लाखांच्या ब्राँझ धातूची लूट केली होती.
अशी घडली होती घटना?
प्रसिद्ध शिल्पकार मंदार गर्गे यांचा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेळगाव ढगा शिवारात गर्गे आर्ट स्टुडिओ आहे. येथे जवळपास 8 जणांच्या टोळीने दरोडा टाकला होता. त्यांनी सुरक्षारक्षक जयदेव जाधव यांना कोयत्याचा धाक दाखवला. ते नमले नाहीत तेव्हा त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यांच्या डाव्या दंडावर आणि हातावर कोयत्याने मारहाण केली. शिवाय सुरक्षारक्षक जाधव यांच्या पत्नी शीलाबाई जाधव यांनाही कोयत्याचा धाक दाखवला. अशी दहशत निर्माण करून जाधव यांच्याकडून स्टुडिओच्या चाव्या घेतल्या आणि ब्राँझ धातूची चोरी केली होती.
हा ऐवज चोरीला
मंदार गर्गे हे ब्राँझ धातूपासून पुतळे बनवतात. त्यांच्या स्टुडिओतून चोरट्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याचे साडेतीनशे किलो वजनाचे दोन भाग, 90 रुपये किमतीची दीडशे किलो वजनाची संत तुकाराम महाराज यांची धातूची वीणा, छत्रपती शिवाजी महारांज्या यांच्या पुतळ्याचा कमरेखाली 2 लाख 70 हजार रुपये किमतीचा भाग, शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची 60 रुपये किमतीची तलवार असा एकूण साधारणतः साडेआठ लाखांचा ब्राँझ धातूचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता.
टोळीमध्ये 2 अल्पवयीन मुले
गर्गे स्टुडिओच्या दरोडाप्रकरणी नाशिक पोलिसांनी मुंबईत जावून परप्रांतीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीत एकूण 5 जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात 2 अल्पवयीन मुले आहेत. या चोरट्यांनी अजून इतर मोठे गुन्हे केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये इतर गुन्ह्यांचा तपास लागू शकतो, असा अंदाज आहे.
नाशिकरांमध्ये भीती
नाशिकची प्रचंड वेगाने क्राईमनगरीकडे सुरू असलेली वाटचाल कधी थांबणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत. काही दिवसांपूर्वी एकाच आठवड्यात झालेले तीन खून, त्यापूर्वी घडलेल्या दरोड्याच्या घटना आणि त्यानंतर आता काल चक्क शिल्पकारांच्या स्टुडिओवर पडलेला दरोडा. हे सर्व सुरू असताना शहराचे पोलीस आयुक्त फक्त हेल्मेटसक्ती हा एकच मुद्दा रेटून धरत आहेत. त्यांनी या घटनांकडेही लक्ष द्यावे. उद्योगनगरीतील गुन्हेगारांचा हैदोस थांबवावा, अशी मागणी होत आहे.
इतर बातम्याः
1 लाख जण अंगावर आले तर काय कराल? राज ठाकरेंचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा, ठाकरे सरकारला कडक सवाल