अरुण गवळी, अबू सालिम, डी. के.राव, मुस्तफा डोसा ते अतिरेकी अजमल कसाब, सर्वांचा थरकाप उडवणारा कारागृह अधीक्षक सेवानिवृत्त
गुन्हेगाराचे कर्दनकाळ म्हणून विशेष ओळख निर्माण करणारे भायखळा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सदानंद गायकवाड हे नुकतेच त्यांच्या तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. (Byculla district jail superintendent Sadanand Gaikwad retired).
मुंबई : महाराष्ट्र कारागृह विभागातील एक शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष, डॅशिंग अधिकारी आणि कारागृहातील गुन्हेगाराचे कर्दनकाळ म्हणून विशेष ओळख निर्माण करणारे भायखळा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सदानंद गायकवाड हे नुकतेच त्यांच्या तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. धिप्पाड शरीरयष्टी, रांगडा स्वभाव आणि बोलण्यात सोलापुरी बाज असणारे सदानंद गायकवाड यांनी आपल्या विशिष्ट कार्यपद्धतीने एक तुरुंग अधिकारी ते कारागृह अधीक्षकपर्यंत मजल मारली. त्यांनी तीस वर्षांच्या सेवेच्या कारकिर्दीत कारागृह विभागातील वरिष्ठ अधिकारी ते कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्याच मनात एक विशेष ओळख निर्माण केली (Byculla district jail superintendent Sadanand Gaikwad retired).
गायकवाडांना बघून मोठमोठ्या गुन्हेगारांची थरकाप उडायची
महाराष्ट्रातील सर्वात मोठे येरवडा कारागृह, तळोजा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह ते मध्यवर्ती कारागृह मुंबई (ऑर्थर रोड) अशा विविध ठिकाणी कार्यरत असताना मुंबईतील गँगस्टर अरुण गवळी, अबू सालिम, डी. के.राव, मुस्तफा डोसा ते अतिरेकी अजमल कसाब असे मोठमोठे गँगस्टर, ज्यांच्या नावाची बाहेर मोठी दहशत होती ते मात्र कारागृहांमध्ये सदानंद गायकवाड या नावाने थरकापत असत. कारण अशा खतरनाक गुन्हेगारांना हाताळण्याचा मोठा हातखंडा गायकवाड यांच्यात होता (Byculla district jail superintendent Sadanand Gaikwad retired).
‘त्यावेळी’ गायकवाडांनी तळोजा कारागृहातील गुन्हेगारांना वठणीवर आणलं
एकदा तळोजा मध्यवर्ती सारख्या मोठ्या कारागृहामध्ये बंदीस्त मोठमोठ्या गुन्हेगारांवर एक वेळ कसलाच वचक न राहिल्याने त्यांनी कारागृहात थैमान घातले होते. अशा परिस्थितीत एका नावाजलेल्या गुन्हेगाराने कारागृहातील अतिसुरक्षा विभागामध्ये बंदीस्त असलेला गँगस्टर अबू सालेम याच्यावर रिव्हॉल्व्हरने जीवघेणा हल्ला केला होता. अशा अवस्थेत त्यांच्यावर आवर आणि वचक आणण्यासाठी त्यावेळी एकमेव डॅशिंग, कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून तत्कालीन महाराष्ट्र कारागृह विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी सदानंद गायकवाड यांची रेग्युलर नियुक्ती रद्द करून तळोजा येथे तातडीने नियुक्ती केली. गायकवाड यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत आपल्या विशिष्ट शैलीने तळोजा कारागृह आठ दिवसात सुरळीत केले.
सदानंद गायकवाड यांच्या निगराणीखाली सिने सेलिब्रेटी
विशेष म्हणजे गायकवाड यांनी ऑर्थर रोड कारागृह येथे कर्तव्य बजावत असताना 26 /11 हल्ल्याचा अतिरेकी अजमल कसाबचे दोन वर्ष सुरक्षा अधिकारी म्हणून विशेष काम पाहिले. त्याचबरोबर संजय दत्त, सलमान खान यांसारखे मोठमोठे सिने सेलिब्रेटी देखील कारागृहात त्यांच्या निगराणीखाली होते.
भायखळ्यातील महिला कैदी गायकवाडांना ‘पप्पा’ म्हणायचे
भायखळा जिल्हा कारागृह आणि मुंबई जिल्हा महिला कारागृह येथे अधीक्षक म्हणून कार्यरत असताना पुरुष कैदींबरोबरच महिला कारागृहातदेखील इंद्रायणी मुखर्जी बरोबर इतर तीनशे ते चारशे महिला कैदी सांभाळण्याची जबाबदारी गायकवाड यांच्यावर होती. कारागृहात महिला कैदी आणि त्यांच्या लहान मुलांसाठी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांतर्गत त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव द्यायचे. तसेच त्यांनी कैद्यांना पुढील आयुष्यासाठी नवीन दिशा देण्याचे काम केले.
कारागृहातील महिला कैदी गायकवाड यांना मायेने पप्पा म्हणत माणसातला देवमाणूस मानत. याच कारागृहात अनेक महिला कैद्यांना कोरोनाची लागण झाली. गायकवाड यांनी घाबरलेल्या महिला कैद्यांना धीर देत त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना कोरोनामुक्त केले.
सेवानिवृत्तीचा निरोप देताना सहकाऱ्यांना अश्रू अनावर
अशा या कर्तव्यनिष्ठ डॅशिंग अधिकाऱ्याची 30 एप्रिलला तीस वर्षांच्या यशस्वी कारकिर्दिनंतर सेवानिवृत्ती झाली. त्यांच्या निरोपाच्या वेळी कारागृहातील अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या लाडक्या साहेबांवर फुलांचा वर्षाव करत सेवानिवृत्तीचा निरोप दिला. यावेळी अनेकांचे अश्रू अनावर झाले.
हेही वाचा : हजारोंच्या खात्यामधील पैसे लंपास करणारे हॅकर्स पोलिसांच्या जाळ्यात, राजस्थानच्या विशेष पथकाची मोठी कामगिरी