भारताला हादरवणारी घटना, रशिया-युक्रेन युद्धासाठी मुंबईसह महत्त्वाच्या शहरांमधून मानवी तस्करी
सीबीआयकडून मानवी तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आलं आहे. रशिया-युक्रेन युद्धासाठी भारतात मानवी तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कृष्णा सोनारवाडकर, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 7 मार्च 2024 : सीबीआयकडून मानवी तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आलं आहे. रशिया-युक्रेन युद्धासाठी भारतात मानवी तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण जगाचं आता या प्रकरणाकडे लक्ष वेधलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. या युद्धासाठी मानवी तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सीबीआयने या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे मानवी तस्करी झालेल्यांचा अधिकृत आकडा हा देखील मोठा आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय-काय माहिती उघड होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सीबीआयकडून मुंबईसह एकूण सात शहरात छापेमारी टाकण्यात आली आहे. या छापेमारीत 50 लाख रोख रक्कम संशयास्पद कागदपत्र आणि तांत्रिक पुरावे आढळले आहे. आत्तापर्यंत 35 जणांची मानवी तस्करी झाल्याचं तपासात समोर आलं आहे. सीबीआयने काही जणांना ताब्यात घेतलं आहे. सीबीआयकडून जवळपास 10 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. सीबीआयने अनेक व्हिजा कन्सल्टन्सी आणि एजंट विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईत मालाड परिसरात सीबीआयची छापेमारी
सीबीआयकडून मुंबईसह दिल्ली, पंजाब, चंदीगड परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. मानवी तस्करी प्रकरणात मुंबईत मालाड परिसरात सीबीआयची छापेमारी सुरू आहे. ओ एस डी ब्रोस अँड विजा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात आणि संचालकांच्या घरी छापेमारी सुरू आहे. कंपनीचे संचालक राकेश पांडे विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतूनही काही जणांची रशिया युक्रेन युद्धासाठी मानवी तस्करी झाली असल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न.
काही तरुण जखमी
सीबीआयच्या तपासानुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विजा कन्सल्टंट कंपन्यांनी आणि एजंटनी तरुणांना चांगला पैसा देण्याचे आमिष दाखवत परदेशात नोकरीची ऑफर दिली. या तरुणांना परदेशात पाठवून ट्रेनिंग देऊन रशियामध्ये डिप्लोय करण्यात आलंय. या तरुणांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रशिया युक्रेंच्या बॉर्डरवर बंदोबस्ताला तैनात करण्यात आलंय. काही तरुणांना गंभीर इजा होऊन ते जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर आलीय. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केलेली आहे.