ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला अटक करणाऱ्या समीर वानखेडेंच्या घरी 13 तास छापेमारी; ‘या’ गोष्टी लागल्या CBI च्या हाती
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला न अडकवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आणि त्यापैकी 50 लाख रुपये आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी ॲडव्हान्स म्हणून स्वीकारल्याचा आरोप आहे.
मुंबई : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि चौघांविरोधात सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेआधी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने याप्रकरणी मुंबईसह 29 ठिकाणी छापे टाकले आहेत. शुक्रवारी सीबीआयने समीर वानखेडे यांच्या घरीही छापे टाकले होते. जवळपास 13 तासांच्या छापेमारीनंतर सीबीआयची टीम पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास वानखेंडेंच्या घरातून निघाली. वानखेडेंनी ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला अटक केली होती.
13 तासांच्या छापेमारीनंतर 10 ते 12 सीबीआयचे अधिकारी बरीच कागजपत्रे आणि एक प्रिंटर घेऊन वानखेडेंच्या घरातून निघाले. एनसीबीचे (अमली पदार्थ नियंत्रण विभाग) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे, एनसीबीचे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंह, तत्कालीन गुप्तवार्ता अधिकारी आशिष रंजन यांच्यासह खासगी व्यक्ती के. पी. गोसावी, सॅन्विल डिसोझा आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. एनसीबीच्या चौकशीच्या आधारावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि फौजरादी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्यन खानला 2 ऑक्टोबर 2021 रोजी क्रूझवर ड्रग्ज घेऊन जाण्यापूर्वीच एनसीबीने अटक केली होती. याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी आर्यन खानविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे चार्जशीटमध्ये आर्यन खानच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता. याप्रकरणी आर्यन खानला दिलासा मिळाल्यानंतर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील तपासात त्रुटी असल्याचा निष्कर्ष एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष दक्षता पथकाने काढला होता. उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी एनीसीबीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या आरोपांबाबत चौकशी केली होती.
सीबीआयचे 29 ठिकाणी छापे
सीबीआयने मुंबई, दिल्ली, रांची, लखनौ, चेन्नई, गुवाहाटी आणि कानपूरमध्ये 29 ठिकाणी शोधमोहीम राबविली आहे. त्यात महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला न अडकवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आणि त्यापैकी 50 लाख रुपये आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी ॲडव्हान्स म्हणून स्वीकारल्याचा आरोप आहे.