कल्याणमध्ये मुळशी पॅटर्न? जेलमधून सुटलेल्या आरोपीचे फटाके फोडत स्वागत, जल्लोषात फरार आरोपीही सहभागी
या घटनेमुळे गुन्हेगारांची हिंमत किती वाढली आहे, हे दिसून येत आहे (Celebration of accused after bail in Kalyan).
ठाणे : गुन्हेगारी विश्वासी संबंधित असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटासारख्याच काही गोष्टी कल्याणमध्ये वास्तवात घडताना दिसत आहेत. एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांचे चक्क फटाके फोडून स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्या समर्थक तरुणांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या जल्लोषात फरार आरोपीचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे गुन्हेगारांची हिंमत किती वाढली आहे, हे दिसून येत आहे (Celebration of accused after bail in Kalyan).
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या शैलेश म्हात्रे या केबल व्यावसायिकावर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन काही आरोपींना अटक केली होती. तर काही आरोपी फरार होते. म्हात्रे यांच्यावर हल्ला करणारे दोन आरोपी मंगेश पावशे आणि सचिन माळी यांची जामीनावर सुटका झाली.
जेलमधून सुटल्यानंतर हे दोन्ही आरोपी चिंचपाडा परिसरात आल्यानंतर त्यांचे फटाके वाजून स्वागत करण्यात आले. जल्लोष साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या जल्लोषात म्हात्रे यांच्यावर हल्ला करणाऱ्या अनंता पावशे नावाचा आरोपीसुद्धा सामील झाला होता, असा दावा शैलेश म्हात्रे यांनी केला आहे. “आरोपी जेलमधून सुटून आले. त्यांनी जल्लोष केला. या जल्लोषात एक फरार आरोपीही सामिल होतो. त्यांच्याकडून माझा जिविताला भविष्यात धोका आहे. पोलिसांनी ठोस कारवाई करुन मला न्याय द्यावा”, अशी विनंती त्यांनी केली आहे.
या प्रकरणी कल्याणचे एसीपी अनिल पवार यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “संबंधित व्हिडीओ चिंचपाडा गावातील आहे. या आरोपींवर कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ज्या फरार आरोपीसंदर्भात बोलले जात आहे. त्याचा तपास सुरु आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल”, असं त्यांनी सांगितलं (Celebration of accused after bail in Kalyan).
हेही वाचा : रक्ताच्या थारोळ्यातील तरुणीच्या कुटुंबीयांना तीन शब्दांवरुन शोधलं, कल्याण पोलिसांची कमाल