एकीशी अरेंज तर दुसरीशी लव्ह मॅरेज, 15-15 दिवस घालवत ‘तो’ दोघींनाही फसवत राहिला..
Cheating In Arrange Marriage : मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने दोन लग्न केली आहेत. तो 15-15 दिवस दोन्ही पत्नींसोबत राहत होता.

मुझफ्फरपूर : प्रेम आंधळं असतं हे तर तुम्ही ऐकलं असेलच, प्रेमातील फसवणुकीचे (Cheating) अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण बिहारच्या (Bihar) मुजफ्फरपूरमध्ये फसवणुकीचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाने चक्क दोन-दोन बायकांशी लग्न (1 man married 2 women) केले. आधी त्याने एका महिलेशी अरेंज मॅरेज केले आणि त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी त्याने प्रेयसीसोबतही प्रेमविवाह केला. मात्र हे प्रकरण उघडकीस येताच, तो लबाड मनुष्य लॉकअपमध्ये पोहोचला.
हे अतरंगी प्रकरण मुझफ्फरपूर जिल्ह्यातील काझी मोहम्मदपूर पोलीस स्टेशन परिसरातील दामचूक येथील आहे. जिथे विकास (30) नावाच्या इसमाने गेल्या वर्षी 25 एप्रिल रोजी साक्रा पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणीसोबत अरेंज मॅरेज केले. आणि त्यानंतर चारच दिवसांनी 29 एप्रिल रोजी त्याच्या प्रेयसीसोबत लग्न केले.
तरूणाने दोघींचीही केली दिशाभूल
विकासच्या कुटुंबीयांना त्याच्या प्रेमप्रकरणाची कोणतीही माहिती नव्हती. आणि त्याची प्रेयसी किंवा तिच्या नातेवाईकांनाही विकासच्या चार दिवसांपूर्वी झालेल्या लग्नाची काहीच कल्पना अथवा माहिती नव्हती. प्रेयसीसोबत लग्न केल्यानंतर विकास हा घरापासून दोन किलोमीटर अंतरावर अघोरिया बाजारजवळ भाड्याच्या घरात राहत होता.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे विकास हा पहिले15 दिवस त्याच्या पहिल्या पत्नीसोबत त्याच्या घरी राहत होता. आणि नंतर कामाच्या बहाण्याने पाटण्याला निघून जायचा. मात्र तो खरोखर पाटण्याला न जाता उरलेले 15 दिवस त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत रहायचा.
रहस्य कसे उघड झाले?
खरंतर विकासच्या पहिल्या पत्नीला त्याच्यावर संशय येऊ लागला होता. की तो दर महिन्याला 15 दिवस सांगून कुठे जातो, असा प्रश्नही तिच्या मनात आला. मात्र जेव्हा तिला (दुसऱ्या लग्नासंबंधी) सत्य कळलं, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तत्काळ पोलिस स्टेशन गाठले आणि पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून विकासला अटक केली.
चोराच्या उलट्या बोंबा, आरोपीने पहिल्या पत्नीवरच लावले आरोप
मात्र पकडले गेल्यानंतर लाज वाटण्याऐवजी विकासने वेदळाच कांगावा केला. आपल्या पहिल्या पत्नीचे आपल्याच मेहुण्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप आरोपी विकासने केला. मला हे लग्नानंतर कळले, असेही तो म्हणाला. जेव्हा मला याबद्दल ( पहिल्या पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल) कळले तेव्हा मी तिच्यापासून दूर राहू लागलो आणि याच दरम्यान मी माझ्या शाळेतील मैत्रिणीशी लग्न केले, असे विकासने सांगितले.
दरम्यान पहिल्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे विकासविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, असे काझी मोहम्मदपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी दिगंबर कुमार यांनी सांगितले. तक्रारदार महिलेने पतीवर दुसरे लग्न करून फसवणूक व अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.