लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, घरही किरायाचं, 21 हजार कोटीच्या गुजरात ड्रग्ज कनेक्शननं तपास, अधिकारीही चक्रावले
गुजरातच्या मुंद्रा बंदरात ज्यावेळेस 21 हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज म्हणजेच हेरोईन जप्त केली त्यावेळेस फक्त तपास यंत्रणाच नाही तर सामान्य माणसालाही हादरा बसला.
चेन्नई : गुजरातच्या मुंद्रा बंदरात ज्यावेळेस 21 हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज म्हणजेच हेरोईन जप्त केली त्यावेळेस फक्त तपास यंत्रणाच नाही तर सामान्य माणसालाही हादरा बसला. जवळपास 3 हजार किलोची हेरोईन नेमकी कुठून कुठे जात होती आणि त्याचे माफिया नेमके कोण याचा शोध घ्यायला सुरुवात झाली. याच प्रकरणावरुन राजकारणही देशात तापलं, सोशल मीडियावर अदानींपासून सत्ताधाऱ्यांवरही काँग्रेससह नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या. पण कच्छमध्ये जप्त करण्यात आलेल्या ह्या ड्रग्जच्या मागे एक साधारण मिडल क्लास कुटूंब आहे असं ऐकलं तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, तपास अधिकाऱ्यांनी चेन्नईतल्या एका दाम्पत्याला अटक केलीय आणि हे दोघे पती पत्नी ड्रग्जच्या काळ्या बाजाराशी संबंधीत असल्याचं तपास अधिकाऱ्यांचं म्हणनं आहे. हे सगळं उघड झाल्यानंतर त्या दाम्पत्यांच्या शेजाऱ्यांना अजूनही विश्वास बसत नाहीय की, जगातला सर्वात मोठा हेरोईनचा साठा जप्त केला, त्याच्याशी आपल्या ह्या किरायाच्या घरात राहणाऱ्या शेजाऱ्यांचं संबंध असेल. पण हे वास्तव आता समोर आलंय.
कोण आहेत ते दाम्पत्य?
इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतचं वृत्त दिलेलं आहे. त्यांच्या बातमीनुसार- तपास यंत्रणांनी अटक केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे मचावरण सुधाकर आणि त्याची पत्नी गोविंदराजू दुर्गा पूर्ण वैशाली. ह्या दोघांना दोन मुलंही आहेत आणि ते चेन्नईच्या कोलापक्कम भागातल्या व्हीओसी स्ट्रीटवरच्या गोवर्धन गिरी अपार्टमेंटमध्ये किरायाच्या घरात राहत होते. इंडियन एक्स्प्रेसला शेजाऱ्यांनी सांगितलं-17 सप्टेंबरला सुधाकर आणि वैशाली यांच्याकडे अनेक पाहुणे आल्याचं दिसत होतं. आता पाहुणे येणं हे काही फार मोठी गोष्ट नाही. पण नंतर लक्षात आलं की हे नेहमीचे साधारण पाहुणे नसून यांचं कनेक्शन हे 21 हजार कोटीच्या हेरोईन जप्तीशी आहे.
21 हजार कोटीच्या ड्रग्जशी नेमकं कनेक्शन कसं?
गुजरातच्या कच्छ भागात मुंद्रा पोर्ट आहे. याच पोर्टवर 21 हजार कोटी रुपयांचे हेरोईन तपास यंत्रणांनी जप्त केले. दोन कंटेनर जे इराणच्या बंदरातून आलेले होते, त्यात हे हेरोईन होते. विशेष म्हणजे फक्त इराणच नाही तर मुळात हे सामान अफगाणिस्तानमधून आलेलं होतं आणि तेही टॅलकम पावडरच्या नावावर. म्हणजे अफगाणिस्तानचं हेरोईन इराणच्या बंदरातून चेन्नईला जात होते. दरम्यान अधिकाऱ्यांना खात्रीलायक टीप मिळाली आणि एवढा मोठा ड्रग्जसाठा जप्त केला. तपास यंत्रणांनी चक्र फिरवली. ज्या कंपनीनं हे कंटेनर आयात केलेले होते, तिचं नाव आशा ट्रेडिंग कंपनी. आणि याच कंपनीचे मालक आहे एम. सुधाकर आणि जी. दुर्गा पूर्णा वैशाली. हे दोघेही जण गेल्या 6 वर्षापासून किरायाच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचं उघड झालंय, ज्याचा किराया फक्त 10 हजार रुपये आहे. म्हणजेच 21 हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये 10 हजार रुपयांच्या किरायाच्या घरात राहणारा असल्याचं उघड होतं. अर्थातच यात फक्त हे दाम्पत्यच असेल असं नाही. पण ते ड्रग्जच्या काळ्याबाजाराशी संबंधीत आहेत. तपास यंत्रणांनी दोघांनाही अटक केलीय. त्यांच्या मुलांना आता चुलत्यांकडे पाठवलं गेलंय.
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली
सुधाकर आणि त्याच्या पत्नीबद्दल जी माहिती तपास यंत्रणांना मिळालीय, त्यामुळे तेही चक्रावून गेलेत. कारण मागच्या लॉकडाऊनमध्ये सुधाकरची नोकरी गेली. त्याच काळात त्यानं आशा ट्रेडिंग कंपनी सुरु केली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुधाकरणं गेल्या वर्षी पत्नीच्या नावावर ही कंपनी सुरु केली होती. आशा ट्रेडिंग कंपनी ही आंध्र प्रदेशातल्या विजयवाडामध्ये नोंदणीकृत आहे आणि विशेष म्हणजे ती सुधाकरणं सासूच्या पत्त्यावर नोंदवलीय.
शेजारी काय म्हणतात?
इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार शेजाऱ्यांच्या दृष्टीनं- सुधाकर आणि त्याची पत्नी हे शांत स्वभावाचे आहेत. शेजाऱ्यापाजाऱ्यांशीही ते अत्यंत नम्रपणे राहतात. विशेष म्हणजे ते धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्याकडे कधी कुणी संशयास्पद व्यक्ती आलीय असं दिसलं नाही. ते इतर कुठल्याही पुजाअर्चा करणाऱ्या कुटुंबासारखे होते. सुधाकरच्या आईशिवाय त्यांच्याकडे कधी कुणी पाहुणेही दिसले नाहीत. वैशालीच्या भावाचे अलिकडेच लग्न झालेले आहे, त्यासाठी ते गेले होते. ते मुळचे आंध्राचे असले तरीही ते बऱ्याच वर्षापासून चेन्नईतच राहतायत, त्यामुळे चांगलं तमिळही बोलतात. एवढच नाही तर सुधाकरला व्यवस्थित हिंदीही येते.
हे ही वाचा :
मालेगाव ड्रग तस्करीचा अड्डा; माफियाची शहरात कोट्यवधींचा मालमत्ता, कुत्ता गोळीचा पुरवठा