भाजयुमोच्या 28 वर्षीय नेत्याची आत्महत्या, नस कापून गळफास, सुसाईड नोटमध्ये प्रेयसीवर आरोप
प्रेयसीने फसवल्यामुळे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख गोपाल सिंह राजपूत यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केल्याची माहिती आहे. गोपाल यांनी आधी आपल्या हाताची नस कापली, त्यानंतर गळफास घेतला
रायपूर : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) चे नेते गोपाल सिंह राजपूत यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीने दगा दिल्याचा आरोप राजपूत यांनी सुसाईड नोटमध्ये केल्याची माहिती आहे. गोपाल सिंह राजपूत यांनी आधी हाताची नस कापली, त्यानंतर गळफास घेऊन आयुष्य संपवलं. छत्तीसगडच्या दुर्ग शहरात ही घटना घडली.
नेमकं काय घडलं?
भाजयुमो नेते गोपाल सिंह राजपूत यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार छत्तीसगडच्या मोहन नगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या शंकर नगर वॉर्ड क्रमांक दहामध्ये घडला. 28 वर्षीय गोपाल सिंह यांनी सोमवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण घेतलं. रात्री बारा वाजता ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी बऱ्याच उशिरापर्यंत त्यांनी दरवाजा उघडला नाही, त्यामुळे मोठ्या भावाने दरवाजा तोडला. तेव्हा गोपाल फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसले. तसंच त्यांचा हातही रक्ताने माखलेला होता.
‘प्रेयसीने फसवल्यामुळे टोकाचं पाऊल’
कुटुंबीयांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवला आणि पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. प्रेयसीने फसवल्यामुळे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख गोपाल सिंह यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केल्याची माहिती आहे. गोपाल सिंह राजपूत यांनी आधी आपल्या हाताची नस कापली, त्यानंतर गळफास घेतला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
उत्तराखंडमध्ये विद्यार्थी नेत्याची प्रेयसीच्या घरी आत्महत्या
दरम्यान, उत्तराखंडमधील विद्यार्थी नेत्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला बेड्या ठोकल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. सुंदर आर्य नावाच्या विद्यार्थी नेत्याने प्रेयसीच्या घरी विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली होती.
संबंधित बातम्या :
प्रेयसीच्या घरी विद्यार्थी नेत्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप
शिवसेना उपतालुका प्रमुखाचा प्रेयसीच्या घरात गळफास, कुटुंबाला हत्येचा संशय