रवी खरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी मुंबई | 6 डिसेंबर 2023 : नवी मुंबईच नव्हे तर मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. नवी मुंबईतून अचानक लहान मुले बेपत्ता होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी अगदी कोवळ्या वयाची आहेत. मुलं गायब होत असल्याने पालकही हादरून गेले आहेत. मुलांचं अपहरण होत असल्याची या पालकांची तक्रार आहे. तर अचानक होत असलेल्या या प्रकारामुळे पोलीसही हादरून गेले आहेत.
नवी मुंबई शहरातून मागील 48 तासात सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. मुले अचानक बेपत्ता होत असल्यामुळे पालक चिंतीत झाले आहेत. गायब झालेली ही सहाही मुले 12 ते 15 वयोगटाची आहेत. बेपत्ता
मुलांचे अपहरण झाल्याची या पालकांची तक्रार आहे. या पालकांनी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे, कळंबोली आदी परिसरातील ही मुले असून याच परिसरातून ही मुले गायब झाली आहेत.
ही सर्व मुले 3 आणि 4 डिसेंबर रोजी गायब झाले आहेत. या सहा मुलांपैकी एक मुलगा कौपरखैरणेमधून गायब झाला होता. दुसरा 12 वर्षाचा एक मुलगाही असाच बेपत्ता झाला होता. नंतर तो ठाणे रेल्वे स्टेशनवर सापडला. गायब झालेल्या मुलांपैकी काही मुलं शाळेत गेल्यावर गायब झाली. कुणी मित्राच्या घरी कार्यक्रमाला तर कुणी वाढदिवसाला गेलेले असताना गायब झाले आहेत. रबाळेतील एक मुलगा तर सार्वजनिक शौचालयात गेला होता. तिथून तो गायब झाला आहे. मुलं अशी अचानक गायब झाल्याने पालक चांगलेच हादरले आहेत. मुलांचं अपहरण करून त्यांचं काही बरंवाईट तर झालं नाही ना? अशी शंका पालक व्यक्त करत आहेत. मात्र मुलं अशी अचानक बेपत्ता होत असल्याने नवी मुंबईत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मुलं गायब होण्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईच नव्हे तर या आधी कल्याण आणि टिटवाळ्यातूनही मुलं गायब झाली होती. त्यांचं अपहरण केल्याचं समोर आलं होतं.
दरम्यान, कल्याणमध्ये तीन महिन्यापूर्वी एक अल्पवयीन मुलगी गायब झाली होती. नोव्हेंबरमध्ये त्या मुलीचा मृतदेह आढळून आला. या मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगितलं जात होतं. या मुलीने घरातच जीवन संपवल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
टिटवाळ्यातील बनेली गावातूनही 25 ऑगस्ट रोजी तीन मुलांचं अपहरण झाल्याची चर्चा होती. ही तिन्ही मुले खेळण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती. त्यावेळी त्यांचं अपहरण झालं असावं असं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं होतं. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती. या प्रकारामुळे टिटवाळ्यातही भीतीचं वातावरण होतं.