धंदा लावण्यावरुन भररस्त्यात राडा, फेरीवाले आणि दुकानातील नोकर भिडले !
रस्त्यावर धंदा लावण्यावरुन वाद झाला. हा वाद टोकाला गेला अन् भररस्त्यात राडाच झाला. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. रोज या ना त्या कारणाने काहीतरी गुन्हेगारी प्रकार घडतच असतात. अशीच एक घटना डोंबिवलीतील टिळक टॉकीज गल्लीत उघडकीस आली आहे. धंदा लावण्यावरुन फेरीवाले आणि एका दुकानातील नोकरामध्ये भररस्त्यात राडा झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. या हाणामारीत नोकर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जितू हवालदास मल्लाह असे मारहाण झालेल्या नोकराचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धंदा लावू नको सांगून ऐकला नाही
टिळक टॉकीज गल्लीतील एका दुकानातील एक नोकर जितू मल्लाह हा दुकानासमोर धंदा लावत होता. यावेळी फेरीवाले बिकेश तिवारी आणि मितेश तिवारी यांनी फिर्यादी जितू यास इथे धंदा लावू नको, असे सांगितले. यावर जितू याने दुकान मालक सांगेल तिथेच धंदा लावणार असे सांगितले. यामुळे बिकेश आणि अंतिम यांना राग आला. या रागाच्या भरात जितू यास शिवीगाळ करून ठोश्या-बुक्क्यांनी मारहाण केली तर अंतिम याने जितू यांच्या डोक्यात स्टीलच्या कड्याने मारहाण केली. यात जितू हा गंभीर जखमी झाला. याबाबत जीतूने दिलेल्या फिर्यादीवरुन रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरला नाही. भरदिवसा घडत असलेल्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.