शिर्डीत साई संस्थानचे सुरक्षारक्षक आणि साईभक्त भिडले, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
रामनवमी निमित्त शिर्डीतील साई मंदिरात तीन दिवस उत्सव सुरु होता. या उत्सवाची शुक्रवारी सांगता झाली. यावेळी मुंबईहून पालखी घेऊन गेलेले साईभक्त आणि मंदिरातील सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला. यामुळे उत्सवाला गालबोट लागले.
शिर्डी / मनोज गाडेकर : आऊटगेटने प्रवेश करणाऱ्या पालखीतील भाविकांना जाण्यास मज्जाव करत संस्थान सुरक्षा रक्षकांनी ढकलून दिल्याने साईभक्त आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद झाला. बघता बघता हा वाद इतका विकोपाला गेला की, वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राहिलेली पिशवी घेऊन येण्यासाठी आत जाण्यास मज्जाव केल्याने हा वाद झाला. साईमंदिराचे प्रवेशद्वार क्रमांक पाचच्या बाहेर मुंबईच्या पालखीतील साईभक्त आणि सुरक्षारक्षकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. साईबाबा संस्थान सुरक्षा विभागाकडून शिर्डी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे संस्थानचे सुरक्षा प्रमुख आण्णासाहेब परदेशी यांनी सांगितले.
तीन दिवसापासून शिर्डीत सुरु होता रामनवमी उत्सव
साईबाबांच्या नगरीत गेल्या तीन दिवसांपासून श्रीरामनवमी उत्सव साजरा होत असून, आज शुक्रवारी उत्सवाची सांगता झाली. शिर्डीत शेकडो पायी पालख्या दाखल झाल्या होत्.या त्यातील एका पालखीतील भाविक आणि संस्थान सुरक्षा रक्षकांमध्ये सुरूवातीला किरकोळ बाचाबाची झाली आणि त्यानंतर तुंबळ हाणामारी झाली.
आऊटगेटने आत सोडण्यास मनाई केल्याने वाद
गेट क्रमांक 5 हे आऊटगेट असून, तेथून प्रवेश दिला जात नाही. मात्र साईभक्तांची एक पिशवी आतमध्ये राहिली होती. ती घेण्यासाठी आत जाऊ देण्याचा आग्रह साईभक्तांनी धरला. मात्र सुरक्षा रक्षकांनी आऊटगेट ऐवजी आत जाणाऱ्या गेट ने जा, असं म्हटल्याने ही मारहाण सुरू झाल्याचं समजतंय.
छत्रपती संभाजी नगरमध्ये दोन गटात राडा
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ओहर गावात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात कारणावरून तुफान राडा झाला. गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेत 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.