मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातील अधिकाऱ्याच्या आई-वडिलांची निघृण हत्या, हॉलमध्ये वृद्ध पतीचा, तर किचनमध्ये पत्नीचा मृतदेह
संबंधित घटेनेमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच ही घटना रात्री की दिवसा घडली हे देखील स्पष्ट झालेलं नाही. घटनास्थळाला सध्या सील करण्यात आलं आहे.
रांची : झारखंड राज्य आज एका वृद्ध दाम्पत्याच्या हत्येच्या घटनेने हादरलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रधान सचिवांचे अतिरिक्त सचिव अरिवंद कुमार यांच्या आई-वडिलांची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुमार यांच्या पलामू जिल्ह्यातील मेदनीनगर येथील घरात वेगवेळ्या खोलीत त्यांच्या आई-वडिलांचा मृतदेह सापडला. संबंधित घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने तपासालादेखील सुरुवात केली आहे.
हत्येमागील कारण अस्पष्ट
संबंधित घटेनेमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच ही घटना रात्री की दिवसा घडली हे देखील स्पष्ट झालेलं नाही. घटनास्थळाला सध्या सील करण्यात आलं आहे. तसेच तपासासाठी रांचीहून एक्सपर्ट टीम दाखल होत आहे. आरोपी दाम्पत्याच्या हत्येसाठीच घरात शिरले होते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळे या हायप्रोपाईल केसमागील गूढ आणखी वाढलं आहं.
मृतक वृद्ध निवृत्त सैनिक, तसेच राजकारणातही सक्रिय
मृतक वृद्धाचं नाव राजेश्वर सिंह असं आहे. तर त्यांच्या पत्नीचं नाव शर्मिला देवी असं आहे. राजेश्वर हे सैन्यात होते. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते राजकारणातही सक्रिय झाले होते. ते कित्येक वर्षांपासून राष्ट्रीय जनता दल पक्षात काम करत होते.
पोलिसांची भूमिका काय?
पलामूचे एसपी चंदन सिन्हा यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आरोपी हे दाम्पत्याची हत्या करण्यासाठीच घरात शिरल्याची शक्यता आहे. कारण दरवाजाची कडी आणि दुसरे लॉकही तोडण्यात आले आहेत, असं सिन्हा यांनी सांगितलं. संबंधित घटना ही हायप्रोफाईल असल्याने एसपी सिन्हा यांनी एसआयटी स्थापन करत तपासाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा :
पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, डोक्यात लोखंडी रॉड मारुन हत्येचा थरार सीसीटीव्ही कैद