राहत्या घरात सुरु होता वेश्याव्यवसाय, मानव तस्करी विरोधी पथकाकडून पर्दाफाश
महाविद्यालयीन विद्यार्थिनींना पैशाचे आमिष दाखवून नको ते काम करायला लावायचे. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली आणि सर्व रॅकेटचा पर्दाफाश केला.
भाईंदर : मीरा भाईंदर परिसरात वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणाऱ्या महिलेला मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी युनिटने अटक केली आहे. ही महिला तिच्या साथीदार तरुणीच्या सहाय्याने स्वतःच्या राहत्या घरातून वेश्याव्यवसाय रॅकेट चालवत होती. याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि रॅकेटची सूत्रधार असलेल्या महिलेला अटक केली आहे. अटक महिलेविरुद्ध भादंवि कलम 370 आणि अनैतिक तस्करी प्रतिबंध कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेची साथीदार आयशा शेख ही फरार झाली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थिनीची सुखरूप सुटका
पोलीस पथकाने वेश्याव्यवसाय रॅकेट उद्धवस्त करतानाच या रॅकेटच्या तावडीतून एका विद्यार्थिनींची सुटका केली आहे. या विद्यार्थिनीची रवानगी कांदिवली येथील पुनर्वसन गृहात करण्यात आली आहे. विद्यार्थिनीला रॅकेटच्या तावडीतून सुखरुपरित्या सोडवण्यात आल्याची माहिती पोलीस पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
कॉलेज विद्यार्थींना पैशांचे आमिष
रॅकेटची सूत्रधार असलेली आणि अटक करण्यात आलेली महिला ही अवघ्या तिशीच्या वयोगटातील आहे. सायरा शेख उर्फ दिव्या मंगळकर असे या महिलेचे नाव आहे. ती भाईंदर येथील स्वतःच्या घरातून वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवत होती. तिने महाविद्यालयीन विद्यार्थींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारात ढकलल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
एनजीओकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई
एनजीओकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांच्या देखरेखीखाली एएसआय उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डमी ग्राहकामार्फत महिलेशी संपर्क साधला. त्या डमी ग्राहकाने संपूर्ण माहिती मिळवली आणि त्याआधारे गुप्त माहिती देताच पोलिसांनी शुक्रवारी दुपारी भाईंदर (पूर्व) येथील न्यू गोल्डन नेस्ट भागातील महिलेच्या फ्लॅटवर छापा टाकला.
अटक महिलेची साथीदार फरार
आरोपी महिलेची साथीदार ग्राहक आणि मुलींमधील एजंट म्हणून काम करीत होती. आयेशा ही पैशांची गरज असलेल्या विद्यार्थिनींना हेरून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलायची. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या जाळ्यात खेचायची, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवघर पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला आहे.