शिर्डीच्या साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, बदनामी केल्याच्या तक्रारीवरुण ‘या’ स्वामीविरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण
शिर्डी पोलीस ठाण्यात गिरीधर स्वामी याच्यासह कार्यक्रमाचे आयोजक हिरालाल श्रीनिवास काबरा यांच्या विरोधात शिवाजी गोंदकर यांनी तक्रार दिली होती.
मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : शिर्डीमध्ये (Shirdi) सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. साईबाबांच्या (Sai Baba) संदर्भात अत्यंत घाणेरड्या भाषेत एका यूट्यूब चॅनलवर गिरीश स्वामी याने एका धार्मिक कार्यक्रमात वक्तव्य केले आहे. यावरून जाती धर्मात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याने शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर (Shivaji Gondkar) यांनी गिरीधर स्वामी आणि इतर दोन व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली होती. साई भक्तांच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद येथील कार्यक्रमात हे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. दिव्य दुनिया गिरीधर स्वामींनी (Giridhar Swami) साईबाबा कौन थे या विषयावर बोलतांना गिरीधर स्वामीने हे विधान केले आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात गिरीधर स्वामी याच्यासह कार्यक्रमाचे आयोजक हिरालाल श्रीनिवास काबरा यांच्या विरोधात शिवाजी गोंदकर यांनी तक्रार दिली होती.
दोघांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात आयपीसी 153 A, 295 A, 298, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
शिवाजी गोंदकर यांनी तक्रारीत म्हंटलं आहे की, साईबाबांच्या बद्दल दिव्य दुनिया नावाच्या यूट्यूब चॅनलवर गिरिधर स्वामी नावाच्या व्यक्तीने अत्यंत खालच्या पातळीवर भाष्य केले आहे.
साईबाबांच्या बद्दल त्यांनी केलेले भाष्य अत्यंत चुकीचे असून त्याचा आम्ही सर्व शिर्डीकर निषेध व्यक्त करत आहोत, त्यांनी केलेल्या विधानाला कुठलाही आधार नाही.
गिरीधर स्वामी साई बाबांना बदनाम करण्याचे काम करत आहे. पैसा कमविण्याच्या हेतूने तो बदनामी करत असल्याचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गिरीधर स्वामीच्या विरोधात शिर्डी पोलीसांनी गुन्हा दाखल होताच शिर्डीमध्ये साईभक्त संताप व्यक्त करत असून पुढील काळात साईबाबा यांच्या विरोधात बोललेल्या गिरीधर स्वामीच्या विरोधात काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
शिर्डीच्या पंचक्रोशीत याबाबत माहिती मिळताच साई भक्त संताप व्यक्त करत असून कठोर कारवाई करणेची मागणी करत आहे, पोलिसांना निवेदन देऊन निषेध करण्याची तयारीही नागरिक करीत आहे.