फेसबुक लाईव्ह करत 40 ते 50 बाटल्या सिरप प्यायला, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा थरारक बचाव
दिल्ली पोलिसांना फेसबुकच्या हेडक्वार्टरकडून संबंधित तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची सूचना मिळाली. या सूचनेच्या आधारे सायबर सेलचे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांना आपल्या टीमच्या अधिकाऱ्यांना संबंधित तरुणांना शोधण्याचे आदेश दिले.
नवी दिल्ली : फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा जीव दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमुळे वाचला. फेसबुकवर पोस्ट लिहित तरुणाने आत्महत्या करण्याचा मानस बोलून दाखवला होता. त्यानंतर फेसबुकवर लाईव्ह करत त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल टीमने तातडीची पावलं उचलत त्याला शोधून काढलं आणि त्याचे प्राण वाचवले.
काय आहे प्रकरण?
दिल्ली पोलिसांना फेसबुकच्या हेडक्वार्टरकडून संबंधित तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची सूचना मिळाली. या सूचनेच्या आधारे सायबर सेलचे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांना आपल्या टीमच्या अधिकाऱ्यांना संबंधित तरुणांना शोधण्याचे आदेश दिले.
डीसीपींचा आदेश मिळताच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाच्या शोधासाठी पोलीस पथकाने प्रयत्न सुरु केले. फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण पश्चिम दिल्लीतील राजोरी गार्डन परिसरातील रहिवासी असल्याचं त्यांना समजलं. हे समजताच सायबर सेलच्या टीमने त्याचं घर शोधून काढलं.
43 वर्षीय व्यक्ती घरी बेशुद्धावस्थेत
डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी सांगितलं की घटनास्थळी 43 वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत सापडली. सायबर पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. थायरॉईडवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या 40 ते 50 बाटल्या प्यायल्याचं तपासादरम्यान समोर आलं आहे.
संबंधित व्यक्ती दिल्लीत एकटीच राहत होती. त्याची पत्नी तीन वर्षांपूर्वी भोपाळला गेली होती. लॉकडाऊनमध्ये तिचा जॉब गेला. त्यामुळेच तो मानसिकदृष्ट्या त्रस्त होता. त्यामुळे त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. फेसबुकवर लाईव्ह करत त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सायबर सेलला वेळीच सूचना मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्यावर मानसोपचारही केले जात आहेत. संबंधित बातम्या :
कंपनीला गाडी लावतो, भाड्यावरील 250 गाड्या परस्पर गहाण, पुण्यात माजी उपसरपंचाला बेड्या
पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! तीन वर्षांच्या लेकराने फटाका गिळला, अतिसाराने मृत्यू