शॉपिंग साईटवर फ्रीजची जाहिरात टाकणं महागात, पिंपरीच्या महिलेची 50 हजारांना फसवणूक
एका सुप्रसिद्ध ऑनलाईन खरेदी विक्री संकेतस्थळावर तक्रारदार महिलेने फ्रीज विक्रीसाठी जाहिरात टाकली होती. महिलेने संकेतस्थळावर पोस्ट केलेली ही जाहिरात पाहिल्यानंतर एका अज्ञात इसमाने तिला सातत्याने क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले.
पिंपरी चिंचवड : ऑनलाईन खरेदी विक्री संकेतस्थळावर फ्रीज विक्रीसाठी जाहिरात टाकणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. सातत्याने क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून एका भामट्याने तिच्या खात्यातून 50 हजार रुपये ट्रान्सफर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात ही घटना घडल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
एका सुप्रसिद्ध ऑनलाईन खरेदी विक्री संकेतस्थळावर तक्रारदार महिलेने फ्रीज विक्रीसाठी जाहिरात टाकली होती. महिलेने संकेतस्थळावर पोस्ट केलेली ही जाहिरात पाहिल्यानंतर एका अज्ञात इसमाने तिला सातत्याने क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले.
50 हजार रुपये ट्रान्सफर
अखेर महिलेने क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तिच्या बँक अकाऊंटवरुन जवळपास 50 हजार रुपये वजा झाले. महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली. मात्र वारंवार आवाहन करुनही ऑनलाइन फ्रॉडला अनेक जण बळी पडत असल्याचं पुन्हा समोर आलं आहे.
परदेशात शिक्षण घेणाऱ्या संगणकतज्ज्ञाचा 22 हजार महिलांना गंडा
दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी नुकतीच देशभरात शॉपिंग साईटवरून 22 हजार महिलांची फसवणूक करणाऱ्याला ठगाला अटक केलीय. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली. विशेष म्हणजे 32 वर्षीय आरोपी संगणकतज्ज्ञ असून त्याने परदेशात शिक्षण घेतलंय. त्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग पैसे मिळवण्याच्या शॉर्टकटसाठी वापरला आणि त्याला तुरुंगाची हवा खावी लागली.
आरोपीने महिलांची फसवणूक करण्यासाठी महिलांसाठी असणाऱ्या अनेक शॉपिंग वेबसाईट्सचा उपयोग केला. या माध्यमातून त्याने विविध महिलांची 70 लाखांची फसवणूक केल्याचं उघड झालंय. त्यामुळेच शॉपिंग संदर्भातील 11 वेबसाईट्स मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या रडारवर आहेत. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास करुन आणखी महिलांची फसवणूक होणार नाही यासाठी कारवाई होणार आहे. या प्रकरणात सायबर सेल अधिक तपास आहे.
पुण्यात मॅट्रिमोनियल साईटवरुन गंडवणारा ठग जेरबंद
दरम्यान, मॅट्रिमोनियल साईटवरुन विश्वास संपादन करुन जवळपास 50 महिलांना फसवणाऱ्या ठकाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली असताना त्याच पद्धतीने चिखली परिसरात राहणाऱ्या आणखी एका महिलेला लुबाडले गेल्याची घटना समोर आली आहे. महिलेची पावणेदोन लाख रुपयांना फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
संबंधित महिलेची ओळख अशाच एका मॅट्रिमोनियल साईटवर 40 वर्षीय व्यक्तीशी झाली. त्याने तिचा विश्वास संपादन करत लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याकडून पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम नेली. त्यानंतर महिलेसोबत विवाह न करता तिची फसवणूक केल्याचा आरोप आहे. किरण कालिदास पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
संबंधित बातम्या :
परदेशात शिक्षण घेणाऱ्या संगणकतज्ज्ञाचा 22 हजार महिलांना गंडा, मुंबई पोलिसांची सुशिक्षित ठगाला अटक
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक, साडे पाच हजाराच्या ड्रेस ऐवजी रद्दी, वापरलेल्या साड्या पार्सल