हॉटेलातील जोडप्यांचा ‘प्रणय’ छुप्या कॅमेऱ्यात कैद करायचे; नंतर इन्स्टावर मेसेज यायचा आणि….
दिल्लीतील बड्या हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे लावून जोडप्यांची शुटींग करणाऱ्या आणि या जोडप्याांना नंतर ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. दिल्ली पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे.
नवी दिल्ली : पैशासाठी लोक किती खालच्या थराला जातात याचा अंदाज लागणं कठिण आहे. नवी दिल्लीतही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे नवी दिल्लीतील हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. दिल्लीतील द्वारका येथील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या जोडप्याला एके दिवशी एक मेसेज आला. तो मेसेज वाचल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हॉटेलमधील प्रणयक्रिडेचा व्हिडीओ यूट्यूबवर टाकण्याची या जोडप्याला धमकी देण्यात आली. त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणीही करण्यात आली. त्यामुळे या जोडप्याच्या तोंडचं पाणी पळालं. पण या जोडप्याने संयमाने वागत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली अन् एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफार्श झाला.
काही दिवसांपूर्वी एक जोडपं द्वारका येथील हॉटेल द ग्रेट इन या हॉटेलमध्ये उतरलं होतं. काही दिवसानंतर त्यांना इन्स्टाग्रामवर धमकावणारा मेसेज आला. तुमचा हॉटेल द ग्रेट इनमधील रोमांसचा व्हिडीओ आमच्याकडे आहे. तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये नाही दिले तर हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल करू. पैसे द्या नाही तर तुमच्या खासगी आयुष्याला चव्हाट्यावर आणू, अशी धमकी या जोडप्याला देण्यात आली होती. हा मेसेज वाचल्यानंतर हे जोडपं टेन्शनमध्ये आलं. ब्लॅकमेलर्सला पकडायचं कसं? त्याच्यापासून पिच्छा सोडवायचा कसा? असा प्रश्न त्यांना पडला. मात्र, या जोडप्याने ब्लॅकमेलर्स समोर न झुकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सरळ पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला.
घरचा भेदीच…
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी आधी आयटी अॅक्टनुसार एफआयआर दाखल करून घेतला. खंडणी वसूलीची कलमंही लावली. त्यानंतर एसीपी राम अवतार, पोलीस निरीक्षक जगदीश कुमार आणि इतर पोलिसांची एक टीम तयार करून तपास चक्र फिरवली. हा तपास सुरू असताना पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. या सर्व ब्लॅकमेलिंग रॅकेटचा मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नसून हॉटेलचा रिसेप्शनिस्ट असल्याचं आढळून आलं. या रिसेप्शनिस्टने दोन मित्रांना हॉटेलमध्ये नोकरी दिली. त्यानंतर त्यांनी हॉटेलात येणाऱ्या जोडप्यांची ब्लू फिल्म बनवण्याचा निर्णय घेतला. तपास सुरू असताना या लोकांनी इन्स्टाग्रामच्या कोणत्या आयडीचा वापर केला होता याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आईडीशी मोबाईल नंबर कनेक्ट होता. उत्तर प्रदेशातील हापूडमधील मनो टोंक येथील हा नंबर होता. मात्र, पत्ता बनावट होता.
विजयला पकडला आणि…
पोलिसांनीही आरोपींना अटक करण्यासाठी सायबर टुल्सचा वापर केला. हापूडमध्ये पोलिसांनी विजय नावाच्या आरोपीला अटक केली. विजयला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ब्लॅकमेलिंगच्या या धंद्यात आकंठ बुडाल्याचं सांगितलं. तसेच आपल्या साथीदारांची नावेही पटापटा सांगितली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता अंकूर आणि दिनेश या दोघांची नावे समोर आली. सुरुवातीच्या जॉबमध्ये विजयला पुरेशी मिळक नव्हती. त्यामुळे त्याने मे 2022मध्ये द ग्रेट इन हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी पत्करली. तिथे त्याच्याकडे हाऊस किपिंगचाही चार्ज होता. तिथेच त्याच्या डोक्यात ब्लू फिल्म करण्याचा किडा वळवळला. अधिक पैसे कमावण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली.
असे व्हायचे काळेधंदे
या तिघांनी हॉटेलच्या रुममध्ये छुपे कॅमेरे लावले होते. हॉटेलमध्ये येणाऱ्या जोडप्यांना कॅमेरे लावलेले रुम दिल्या जायचे. त्यांचे प्रणय दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर या जोडप्यांना मेसेज करून त्यांना धमकावलं जायचं. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जायचे, असं त्याने सांगितलं. विजयने नंतर ऑगस्ट 2022मध्ये नोकरी सोडली. पण त्याचे मित्र अंकूर आणि दिनेशला हा धंदा पुढे सुरू ठेवण्यास सांगितलं. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी बनावट पत्त्यावर सिम कार्ड देणारा दुकानदार दीपलाही अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी पाच मोबाईल फोन, एक हार्ड डिस्क, 54 ब्लँक सिम कार्ड आणि एक बायोमॅट्रीक मशीन जप्त केली आहे.